
- लायन्स क्लब नाशिक पंचवटीच्या पदग्रहण सोहळ्यात नूतन अध्यक्ष सीमा सोनजे यांनी स्वीकारला पदभार
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : लायन्स क्लब नाशिक पंचवटीने आपल्या सामाजिक बांधिलकीचा वारसा पुढे नेत आगामी काळात मोठ्या प्रमाणावर समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा संकल्प केला आहे. क्लबला ३६ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पुढील ३६ महिन्यांत एक मोठे आणि कायमस्वरूपी समाजोपयोगी सेवाकार्य उभे करावे, असे आवाहन पदग्रहण अधिकारी लायन फत्तेचंद रांका यांनी केले.
लायन्स क्लब नाशिक पंचवटीचा ३६ वा पदग्रहण सोहळा नाशिक येथे उत्साहात पार पडला. यावेळी सौ. सीमा प्रशांत सोनजे यांनी अध्यक्षपदाचा, श्री. मकरंद महेश सोमण यांनी सचिवपदाचा, तर सौ. सुजाता दिनेश कोहोक यांनी खजिनदारपदाचा पदभार स्वीकारला. पदग्रहण अधिकारी लायन फत्तेचंद रांका आणि माजी प्रांतपाल वैद्य विक्रांत जाधव यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना पदभार देण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना लायन फत्तेचंद रांका म्हणाले, “विविध सेवाकार्य हीच लायन्स क्लबची खरी ओळख आहे. समाजात अनेक दुर्बल व गरजू घटक आहेत. त्यांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. सेवाकार्य सुरू केले की समाजातील अनेक दानशूर व्यक्ती मदतीसाठी पुढे येतात. त्यामुळे क्लबच्या सर्व सदस्यांनी मन आणि धन देऊन सेवाकार्यात सहभागी व्हावे.” क्लबला ३६ वर्षे पूर्ण झाली असून आगामी ३६ महिन्यांत मोठे कायमस्वरूपी समाजोपयोगी कार्य उभे करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
माजी प्रांतपाल वैद्य विक्रांत जाधव यांनी क्लबने आतापर्यंत केलेल्या विविध सेवाकार्याचे कौतुक करून भविष्यातही सेवाकार्याची व्याप्ती वाढवून क्लबचे नाव आणखी उंचावावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. अशोक सोनजे यांनीही लायन्स क्लबच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत समाजोपयोगी संस्था अधिकाधिक लोकांच्या मदतीसाठी पुढे याव्यात, असे आवाहन केले.
नूतन अध्यक्ष सीमा सोनजे यांनी पदग्रहणाच्या दिवशीच विविध सेवाकार्यांना सुरुवात केली. आगामी वर्षात ५० हजार वृक्षांची लागवड व संगोपन करण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला. त्याची प्रातिनिधिक सुरुवात वृक्षारोपण करून करण्यात आली. तसेच गेल्या २१ वर्षांपासून सुरू असलेल्या गरजू महिलांना स्वयंरोजगारासाठी शिलाई मशीन देण्याच्या उपक्रमांतर्गत एका महिलेला शिलाई मशीन देण्यात आली. शाळेतील ३५० गरीब विद्यार्थ्यांना गणवेश व बूट देण्यात आले. वाचन संस्कृती वाढावी यासाठी जोशी आठवले शाळेतील विद्यार्थ्यांना वाचनाची पुस्तके व पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले.
आगामी वर्षात विद्यार्थ्यांना उपयुक्त साहित्य देणे, गरजू कुटुंबांना धान्य वाटप करणे यासह विविध सेवाकार्यांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे सीमा सोनजे यांनी सांगितले. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सेवाभावी संस्थांनी आपला खारीचा वाटा उचलून प्रशासनाला सहकार्य करावे, अशी भूमिकाही क्लबने व्यक्त केली.
कुंभमेळ्यानिमित्त ‘नाशिक कुंभ नागरी–माया नागरी’ ही विशेष पुस्तिका प्रकाशित करण्यात येणार आहे. नाशिकची वैशिष्ट्ये, कुंभमेळा आणि शहरातील मान्यवरांचे लेख यांचा समावेश असलेली ही पुस्तिका मोफत वितरित केली जाणार असून सुरुवातीला ५० हजार प्रती प्रकाशित करण्याचा मानस आहे. या पुस्तिकेचे काम सुरू असल्याची माहिती संपादक वैद्य विक्रांत जाधव यांनी संपादक मंडळाच्या वतीने दिली.
सचिव मकरंद सोमण यांनी कुंभमेळ्याच्या कालावधीत गोदावरीच्या तीरावर भाविकांसाठी तात्पुरते वस्त्रांतरगृह उभारण्याचा मानस व्यक्त केला. तसेच औषधांसह वैद्यकीय शिबिरे, रक्त तपासणी शिबिरे आणि आपत्कालीन सेवा कक्ष उभारण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.
मागील वर्षभरात विविध सेवाकार्य करणाऱ्या क्लबच्या सदस्यांचा लायन फत्तेचंद रांका यांच्या हस्ते विशेष पीन देऊन सन्मान करण्यात आला. “सर्वांनी एकत्रित सहभाग नोंदवून मोठे सेवाकार्य उभे करणे हीच सिंहस्थ कुंभमेळ्याला लायन्स क्लबची छोटीशी देणगी ठरेल,” असा संदेश यावेळी देण्यात आला.
कार्यक्रमास रिजन अधिकारी ला. हंसराज देशमुख, झोन अधिकारी ला. राहुल वेढणे, अशोक सोनजे, माजी अध्यक्ष ला. राजेंद्र जाधव, ला. नंदेश यंदे, ला. सुनील देशपांडे, ला. अरुण अमृतकर, ला. प्रशांत सोनजे, ला. रीतू चौधरी यांच्यासह नाशिक व मनमाड येथील विविध लायन्स क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते. पुणे येथील ‘लेट्स मिट’ या सेवाभावी संस्थेचे सचिव उत्कर्ष गांधी विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते. सूत्रसंचालन सौ. नयना अमृतकर व सौ. नीलिमा जाधव यांनी केले. आभार सचिव मकरंद सोमण यांनी मानले.
Comments are closed.