- सामाजिक कार्यकर्ते निलेश दगुजी चव्हाण यांची मागणी
** एनजीएन न्यूज नेटवर्क
विंचूर : मच्छिंद्र साळुंके
विंचूर (ता. निफाड) येथे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने आधुनिक तंत्रज्ञानयुक्त ट्राॅमा सेंटर तसेच सर्व सुविधांनी सुसज्ज शासकीय मल्टीस्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते निलेश दगुजी चव्हाण यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, विंचूर हे निफाड तालुक्यातील महत्त्वाचे व्यापारी, कृषी, औद्योगिक व शैक्षणिक केंद्र असून देशातील पहिला वाईन पार्क तसेच आशियातील सर्वात मोठ्या कांदा बाजारपेठेच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे विंचूर उपबाजार असल्याने परिसरातील मोठे व्यापारी केंद्र निर्माण झाल्याने उद्योग व्यवसाय व व्यापारा निमीत्ताने इतरही जिल्ह्यातील परिसरास जोडलेले आहे. त्यामुळे नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील कोपरगाव, वैजापूर, गंगापूर, येवला, चांदवड, नांदगाव आणि सिन्नर या परिसरातील हजारो नागरिकांची दररोज या मार्गावर ये-जा असते. विंचूर उपबाजारातील कांदा व धान्य मार्केट असल्याने जिल्हा व जिल्ह्याबाहेरील परिसरातील शेतकरी, व्यापारी खरेदी विक्री निमीत्ताने विंचूर बाजारपेठेशी जोडलेले असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते यामुळे छोट्या मोठ्या वाहनांची गर्दी होते तसेच आसपासच्या गावातील अनेक विद्यार्थी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणासाठी विंचूर येथे पुर्वीपासुन येतात तसेच विंचूर परिसरातील उद्योग, व्यापार व औद्योगिक क्षेत्रातील व्यवसाय व कृषी प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणावर होत असल्याने आर्थिक व्यवहारामुळे पंचक्रोशीतील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असल्याने विंचूर बाजारपेठेत दैनंदिन स्वरुपात मोठ्या प्रमाणावर गर्दी असते.
विंचूर–नाशिक, विंचूर–येवला, विंचूर–लासलगाव–चांदवड या मार्गांवर वाहतुकीचे प्रमाण मोठे असल्याने अपघातांचे प्रमाण देखील वाढत आहे. मात्र, अपघातग्रस्तांना उपचार मिळावेत यासाठी परिसरात अद्ययावत ट्राॅमा सेंटर अथवा सर्व सुविधा असलेले मल्टीस्पेशालीटी शासकीय रुग्णालय उपलब्ध नसल्याने रुग्णांना नाशिक किंवा इतर शहरांमध्ये हलवावे लागते. त्यामुळे वेळ, खर्च आणि जीवितहानीचा धोका वाढत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
विंचूर ता निफाड जि नाशिक परिसरातील वाढती लोकसंख्या व नागरीकरणाचे दृष्टीकोनातून परिसरातील नागरिकांचे आरोग्याचेहिताचे दृष्टीकोनातून विविध प्रकारचे आजाराचे निदान व चिकित्सेसाठी नागरी आरोग्याचे हिताचे दृष्टीकोनातून कोणत्याही प्रकारची आधुनिक तंत्रज्ञानयुक्त अद्यावत अत्यावश्यक नागरी आरोग्य सेवा सुविधा उपलब्ध नसल्याने जसे हृदयरोग, मेंदूविकार, अस्थिरोग, स्त्रीरोग, बालरोग, शस्त्रक्रिया व अतिदक्षता उपचारांसाठीही स्थानिक नागरिकांना नाशिक अथवा दूरच्या शहरांमध्ये जावे लागत असल्याने विंचूर येथे शासकिय आधुनिक ट्राॅमा सेंटर व स्मार्ट मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे.
मानवी जीवनाचे उज्वल भवितव्याचे हिताचे दृष्टीने आरोग्य हि मुलभुत गरज असल्याने विंचूर पंचक्रोशीतील आसपासच्या इतर गावांतील अनेक गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल ग्रामीण नागरिकांना वेळेत व गुणवत्तापूर्ण शासकीय आरोग्य सेवा उपलब्ध होईल, अपघात प्रसंगी लोकांना तत्काळ अत्यावश्यक उपचार उपलब्ध होवुन अपघातग्रस्तांचे प्राण वाचतील तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना वेगवेगळ्या आजारा संबंधित आधुनिक वैद्यकीय उपचारासाठी दूरच्या शहरांमध्ये जाण्याची आवश्यकता मोठ्या प्रमाणात कमी होईल.
महाराष्ट्र शासनाचे सार्वजनिक नागरी आरोग्याचे हिताचे दृष्टीकोनातून आधुनिक तंत्रज्ञानयुक्त, सर्व अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज नागरी आरोग्याची सेवा सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा शासकीय प्रकल्प विंचूर परिसरात होण्यासाठी यासंदर्भात यापूर्वी पंचायत समिती निफाडचे गटविकास अधिकारी यांना निवेदन व स्मरणपत्र देण्यात आले असून विंचूर ग्रामसभेचा ठरावही सादर करण्यात आला आहे. मात्र, अद्याप कोणतीही ठोस प्रशासकीय कार्यवाही झालेली नसल्याने जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी तातडीने स्थळ पाहणी करून सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करावा, शासनाकडे प्रस्ताव सादर करावा, आवश्यक निधी व प्रशासकीय मान्यता मिळविण्यासाठी पाठपुरावा करण्यात यावा या निवेदनाची प्रत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक यांना देखील देण्यात आली आहे.
Comments are closed.