
- मोर्चा, धरणे आंदोलन; विविध संघटनांचे निवेदन
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसह शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांवर आज नाशिकमध्ये विविध विद्यार्थी, कामगार, शेतकरी, सामाजिक व पुरोगामी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने मोर्चा व दोन तासांचे धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शालिमार येथून महात्मा गांधी रोड, मेहेर सिग्नल, सीबीएस मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. त्यानंतर उपजिल्हाधिकारी राजपूत यांना पंतप्रधानांच्या नावे निवेदन देण्यात आले.
आंदोलनात दिल्लीतील जंतर-मंतर येथे पर्यावरणवादी, शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक तसेच विविध विद्यार्थी संघटनांकडून सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करण्यात आला. आंदोलकांनी केंद्र सरकारने शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांवर तातडीने चर्चा करावी, आंदोलनकर्त्यांवरील कारवाई थांबवावी आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.
निवेदनात नीट (NEET) परीक्षेतील कथित गैरप्रकार, प्रवेश परीक्षांची विद्यमान पद्धत, शिक्षणाचे वाढते बाजारीकरण, नवीन शैक्षणिक धोरणाचा (NEP) पुनर्विचार, शिक्षक पात्रता परीक्षा (TET) घोटाळ्याची चौकशी, विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरील दडपशाही थांबविणे, खाजगी शाळा-महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची अडवणूक रोखणे आणि शिक्षणावर सकल अर्थसंकल्पाच्या किमान सहा टक्के खर्च करून सार्वजनिक शिक्षण व्यवस्था बळकट करावी, अशा विविध मागण्या करण्यात आल्या.
धरणे आंदोलनादरम्यान ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (AISF)च्या वतीने शहीद भगतसिंग यांच्यावरील पुस्तिकांची विक्री करण्यात आली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील सहा दिवसांपासून रिंगरोड बाधित शेतकरी व करण गायकर यांच्या सुरू असलेल्या उपोषणाला सर्व आंदोलकांनी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला. यावेळी “शेतकरी एकजूट जिंदाबाद” आणि “विद्यार्थी-कामगार एकजूट जिंदाबाद” अशा घोषणा देण्यात आल्या व शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीने मान्य करण्याची मागणी करण्यात आली.
या आंदोलनात भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (AISF), डीवायएफआय (DYFI), IPTA, एनएसयूआय (NSUI), शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच, आयटक (AITUC), सीटू (CITU), संविधान सन्मान वकील संघ, आरपीआय (सेक्युलर), घंटागाडी कर्मचारी संघटना, एम्स चॅरिटेबल ट्रस्ट, डॉ. राम मनोहर लोहिया नागरी सहकारी पतसंस्था, राष्ट्रसेवादल, मराठी विज्ञान परिषद, मानवतावादी बहुउद्देशीय संस्था, अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अनिस), मानव उत्थान मंच, जीवन उत्सव आदी संघटनांनी सहभाग घेतला. मोठ्या संख्येने विद्यार्थी, युवक, कामगार व नागरिक उपस्थित होते.
यावेळी कॉ. राजू देसले, कॉ. डॉ. डी. एल. कराड, कॉ. मनोहर पगारे, ॲड. तानाजी जायभावे, डॉ. मिलिंद वाघ, मुकुंद दीक्षित, कॉ. तल्हा शेख, कॉ. प्राजक्ता कापडणे, कॉ. राहुल गायकवाड, समाधान बागुल, ॲड. प्रभाकर वायचळे, ॲड. श्यामला चव्हाण, कॉ. भिमा पाटील, कॉ. सीताराम ठोंबरे, कॉ. गौतम कोंगळे, मुक्ता कावळे, विजय बागुल, ॲड. कृष्णा शिलावट, महादेव खुडे, सुरेश गायकवाड, डॉ. मच्छिंद्र बोचरे, नागेश धुर्वे, अजमल खान, मीनाझ मिर्झा, शांताराम चव्हाण, वसंत एकबोटे, डॉ. महेंद्र नाकील, अजित टक्के, बंडू नाना डांगे, ॲड. गोदावरी देवकाटे, शिवदास म्हसदे, राजकुमार सावंत, व्ही. टी. जाधव, सोमा कुऱ्हाडे, जगबीर सिंग, वासंती दीक्षित, गौतम भटेवरा, डॉ. अर्चना तोंडे, ॲड. शरद कोकाटे, अमोल लोणारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Comments are closed.