NGN News
Latest Marathi News

विकसित अभियान आरंभ: एचएएल वेंडर डेव्हलपमेंट मीट आजपासून

  • संरक्षण क्षेत्रातील व्यवसायाच्या नव्या संधींसाठी उद्योगांना व्यासपीठ; एचएएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिकला देशातील अग्रगण्य औद्योगिक केंद्र बनविण्याच्या उद्देशाने नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)च्या ‘विकसित नाशिक अभियान २०२६’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा प्रारंभ १० व ११ जुलै रोजी सातपूर येथील निमा हाऊसमध्ये होणाऱ्या एचएएल वेंडर डेव्हलपमेंट मीटने होत आहे. या दोन दिवसीय कार्यक्रमाचे उद्घाटन शुक्रवारी (१० जुलै) सकाळी १०.३० वाजता होणार आहे.

केंद्र सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानामुळे संरक्षण क्षेत्रात स्वदेशी उत्पादनाला मोठी चालना मिळत असून, त्याचा लाभ स्थानिक उद्योगांना मिळावा या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. *हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल)*च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उद्योगांना संरक्षण क्षेत्रातील पुरवठा साखळीत सहभागी होण्यासाठी आवश्यक माहिती, मार्गदर्शन आणि थेट संवादाची संधी उपलब्ध होणार आहे.

मेळाव्यात एचएएलला आवश्यक असणाऱ्या विविध उपकरणांचे आणि घटकांचे प्रदर्शनही भरविण्यात येणार आहे. मशिनिंग, फॅब्रिकेशन, इलेक्ट्रॉनिक घटक, अभियांत्रिकी सेवा, सुटे भाग आदी क्षेत्रांत कार्यरत असलेल्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी हा कार्यक्रम विशेष महत्त्वाचा ठरणार आहे.

निमा अध्यक्ष आशिष नहार यांनी सांगितले की, ‘विकसित नाशिक अभियान २०२६’ हा नाशिकच्या औद्योगिक विकासाचा व्यापक आराखडा असून संरक्षण, खादी व ग्रामोद्योग, माहिती तंत्रज्ञान आणि ऊर्जा या चार प्रमुख क्षेत्रांवर विशेष भर दिला जाणार आहे. या अभियानांतर्गत एचएएल वेंडर डेव्हलपमेंट मीट, खादी उद्योग कुंभ, आयटी कॉन्क्लेव्ह आणि निमा पॉवर अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

गेल्या दोन वर्षांत निमा आणि उद्योग क्षेत्राच्या संयुक्त प्रयत्नांतून नाशिकमध्ये सुमारे ४० हजार कोटी रुपयांची औद्योगिक गुंतवणूक आल्याचा दावा नहार यांनी केला. या गुंतवणुकीमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती झाली असून, विकसित नाशिक अभियानातून नाशिकला देशातील अग्रगण्य औद्योगिक जिल्हा बनविण्याचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.

या मेळाव्यात सहभागी होऊन संरक्षण क्षेत्रातील नव्या व्यावसायिक संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन निमा अध्यक्ष आशिष नहार यांच्यासह उपाध्यक्ष किशोर राठी, मनीष रावल, राजेंद्र अहिरे, राजेंद्र वडनेरे, किरण पाटील आणि दीपाली चांडक यांनी उद्योगांना केले आहे.

Comments are closed.