
- मातृ-पितृ पूजनाचा लक्षवेधी सोहळा, हजारो माता-पित्यांचा उत्स्फूर्त सहभाग
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : अमर आढाव
जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने, निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज यांच्या परंपरेनुसार उत्तराधिकारी अनंत विभूषित श्रीमद जगदगुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाखाली अयोध्येत सुरू असलेल्या भव्य धर्मसोहळ्यात मातृ-पितृ पूजनाचा अतिशय भावस्पर्शी व प्रेरणादायी सोहळा उत्साहात संपन्न झाला. श्रीरामांनी माता-पित्यांप्रती जपलेला आदर्श समाजात रुजविण्याचा संदेश या सोहळ्यातून देण्यात आला.
हजारो माता-पित्यांची भव्य मिरवणूक, जयघोष, भजन-कीर्तन आणि भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याने उपस्थित भाविकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले. त्यानंतर विधिवत मातृ-पितृ पूजन करण्यात आले. आपल्या जीवनातील प्रथम दैवत असलेल्या आई-वडिलांचा सन्मान व सेवाच खरी ईश्वरसेवा असल्याचा संदेश अनंत विभूषित श्रीमद जगदगुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांनी आपल्या मार्गदर्शनातून दिला. उपस्थित भाविकांनीही हा संस्कार आपल्या कुटुंबात जपण्याचा संकल्प केला.
अयोध्येत सुरू असलेल्या या धर्मसोहळ्यात दररोज विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांना भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. जपानुष्ठान, महायज्ञ, अखंड नंदादीप, श्रीरामचरितमानस पारायण, सामूहिक हनुमान चालीसा पठण, सत्संग, प्रवचन, तसेच पहाटे ब्रह्ममुहूर्तावर नित्यनियम विधी, ध्यान, प्राणायाम, आरती आदी कार्यक्रम अत्यंत भक्तिभावाने संपन्न होत आहेत. संपूर्ण परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघाला असून देशभरातून आलेले हजारो भाविक या सोहळ्याचा लाभ घेत आहेत. जगदगुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने आयोजित या धर्मसोहळ्यामुळे अध्यात्म, संस्कार आणि भारतीय संस्कृतीचा जागर देशभरात पोहोचत असल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली. श्रीरामांच्या आदर्श जीवनमूल्यांचा संदेश जनमानसात रुजविणारा हा सोहळा अयोध्येच्या पावन भूमीत भक्ती, श्रद्धा आणि संस्कारांचा अविस्मरणीय उत्सव ठरत आहे.
Comments are closed.