
मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते वारकरी सेवा अभियानाचे उद्घाटन; जीवनावश्यक वस्तू, रेनकोट वाटप व आरोग्य शिबिरासह हरित वारीसाठीही पुढाकार
नाशिक: एनजीएन न्यूज नेटवर्क
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळा पंढरीच्या दिशेने रवाना होत असताना राज्यभरातून लाखो वारकरी आळंदी आणि देहूमध्ये दाखल झाले आहेत. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचे प्रतीक असलेल्या पंढरपूर वारीशी फिनोलेक्स पाईप्सने गेली तीन दशके जपलेले सामाजिक बांधिलकीचे नाते यंदा अधिक दृढ केले आहे.
वारकऱ्यांच्या सेवेसाठी फिनोलेक्स पाईप्सतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी फिनोलेक्स पाईप्स आणि मुकुल माधव फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष प्रकाश पी. छाब्रिया, मुकुल माधव फाउंडेशनच्या अध्यक्षा रितू पी. छाब्रिया यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात येत आहे.
आठशे वर्षांहून अधिक काळापासून पांडुरंगाच्या भेटीसाठी शेकडो किलोमीटर पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांसाठी यंदा फिनोलेक्स पाईप्सक आणि त्यांचे सीएसआर भागीदार मुकुल माधव फाउंडेशनतर्फे सुमारे पाच लाख जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात येत आहे. यामध्ये तीन लाखांहून अधिक युटिलिटी बॅग, ५० हजार पावसाळी कुंचे (घोंगते), ज्येष्ठ वारकऱ्यांसाठी आधाराच्या काठ्या तसेच इतर आवश्यक साहित्याचा समावेश आहे. वारी मार्गावर विविध ठिकाणी आयोजित मोफत वैद्यकीय शिबिरांतून आरोग्य तपासणी, तज्ज्ञांचा सल्ला, औषधे आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा पुरविली जात आहे.
वारीच्या यशस्वी व्यवस्थापनासाठी कार्यरत असलेल्या पोलिस प्रशासनालाही फिनोलेक्सने मदतीचा हात दिला आहे. हजारो पोलिस कर्मचाऱ्यांना रेनकोट आणि पंढरपूर पोलिसांच्या ‘क्विक रिस्पॉन्स टीम’साठी विशेष जॅकेट्स देण्यात आले आहेत. तसेच पंढरपूर पोलिस विभाग आणि मंदिर समितीच्या सहकार्याने वारकऱ्यांच्या सोयीसाठी माहिती व सतर्कता फलक उभारण्यात येत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘चरणसेवा’ उपक्रमांत स्वयंसेवकांना १० हजार टी-शर्ट्स व टोप्यांचे वाटप करण्यात येत आहे. पर्यावरण संवर्धनालाही प्राधान्य देत पंढरपूरमध्ये वृक्षारोपण मोहीम आणि महत्त्वाच्या ठिकाणी कचरापेट्यांची व्यवस्था करण्यात येत आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “भारतात ‘पाईप’ म्हटले की सर्वप्रथम फिनोलेक्स पाईप्स अँड फिटिंग्जचे नाव समोर येते. फिनोलेक्सने गेल्या ४५ वर्षांत महाराष्ट्रासह देशाच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. उद्योग क्षेत्राबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वही तितक्याच प्रभावीपणे जपणाऱ्या फिनोलेक्स पाईप्स आणि मुकुल माधव फाउंडेशनने गेली तीन दशके पंढरपूर वारीत वारकऱ्यांची सेवा करून समाजाप्रतीची बांधिलकी सिद्ध केली आहे. वारकऱ्यांसाठी आरोग्यसेवा आणि इतर सुविधा उपलब्ध करून देणारा हा उपक्रम स्तुत्य आहे. या सेवाभावी उपक्रमाचे उद्घाटन करण्याची संधी मिळणे माझ्यासाठी आनंदाची बाब असून, फिनोलेक्ससारखी समाजहिताची परंपरा जपणारी कंपनी महाराष्ट्रात असल्याचा अभिमान वाटतो.”
फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष प्रकाश पी. छाब्रिया म्हणाले, “पंढरपूर वारी ही श्रद्धा, समर्पण आणि निःस्वार्थ सेवेचे प्रतीक आहे. ग्रामीण महाराष्ट्रातील जनतेने, शेतकऱ्यांनी गेल्या ४५ वर्षांत फिनोलेक्सवर दाखविलेल्या विश्वासामुळेच आमचा प्रवास अधिक समृद्ध झाला आहे. वारकऱ्यांची सेवा करून त्या विश्वासाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. फिनोलेक्सने ४५ वर्षांच्या वाटचालीत समाजसेवा आणि समुदाय विकासाला केंद्रस्थानी ठेवत पंढरपूर वारीशी असलेले नाते अधिक मजबूत केले असून, परंपरा आणि सामाजिक उत्तरदायित्व यांचा संगम साधणाऱ्या या उपक्रमाला विशेष महत्त्व आहे. समाजाशी आणि परंपरेशी असलेली आमची बांधिलकी यापुढेही कायम राहील.”
Comments are closed.