
जिल्ह्यात मुसळधार; आगामी ४८ तास धोक्याचे; जलाशयांत वाढ होण्याची शक्यता
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : नाशिकवर अतिवृष्टीचे मोठे संकट ओढवण्याची शक्यता असताना मुसळधार पावसाला कारणीभूत ठरणाऱ्या हवामानातील भोवऱ्याने (Vortex) दिशा बदलल्याने दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाने सोमवारी नाशिकमध्ये एका दिवसात तब्बल ३५० मिमी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. या पार्श्वभूमीवर नाशिक शहर आणि त्र्यंबकेश्वर परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. सोमवारी रात्री नाशिकसह जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला, तर मंगळवारी सकाळपासूनही पावसाची संततधार कायम आहे. सध्या त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी परिसरात सर्वाधिक पर्जन्यवृष्टी होत आहे.
हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, पालघरमध्ये सुमारे ४५० मिमी पाऊस पाडणारा भोवरा मंगळवारी नाशिक–त्र्यंबकेश्वर परिसराकडे सरकेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, नव्या हवामान निरीक्षणानुसार हा भोवरा उत्तर दिशेला गुजरातमधील सुरत आणि दक्षिण दिशेला अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले परिसराकडे सरकल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे नाशिकमध्ये ढगफुटीसदृश अतिवृष्टी होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.
पश्चिम घाट परिसरात अद्यापही मुसळधार पाऊस सुरू असला, तरी एकूण परिस्थिती नियंत्रणात असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरच्या दिशेने येणारे पावसाचे ढग आता गुजरातमधील सुरत आणि अहिल्यानगरमधील अकोलेच्या दिशेने सरकत आहेत. तथापि, अतिवृष्टीचा धोका कमी झाला असला तरी आगामी ४८ तासांत नाशिक, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर परिसरात मुसळधार पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, नदी-नाल्यांपासून दूर राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
धरणांतील पाणीसाठ्यात वाढ
सोमवारी रात्रीपासून धरण क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. गंगापूर धरण ३७ टक्के भरले आहे. दारणा धरणातील पाणीसाठा २१ टक्क्यांवर पोहोचला आहे. भावली धरण ५६ टक्के क्षमतेपर्यंत भरले आहे. जिल्ह्यातील सर्व धरणांमधील एकूण पाणीसाठा २८ टक्क्यांवर पोहोचला आहे. सतत सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील परिस्थितीवर जिल्हा प्रशासनाकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.
२७ कुटुंबे सुरक्षितस्थळी
त्रंबकेश्वर, इगतपुरी आणि लगतच्या तालुक्यांना रेड अलर्ट दिल्याने मंत्री गिरीश महाजन घोटी इगतपुरीची पाहणी करून रात्री 11 वाजता त्रंबकेश्वरमध्ये दाखल झाले. त्रंबकेश्वर तालुक्यातील मेटघर गावाची रात्री 12 वाजता पहाणी केली. सोसाट्याचा वाऱ्यामुळे रात्री पावसाचा जोर वाढल्याने मंत्री महाजन यांनी 27 कुटूंबातील 100 हुन अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याच्या सूचना दिल्यात.
Comments are closed.