NGN News
Latest Marathi News

प्रेमाचे आमिष, अत्याचार आणि धर्मांतराचा कथित प्रयत्न

पीडितेच्या तक्रारीवरून संशयिताविरोधात गुन्हा; आरोपी फरार

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : परराज्यातून उदरनिर्वाहासाठी नाशिकमध्ये आलेल्या एका ४१ वर्षीय महिलेची प्रेमाच्या आमिषाने फसवणूक करून तिच्यावर अत्याचार केल्याचा तसेच तिच्यावर दुसऱ्या धर्माच्या धार्मिक प्रथा पाळण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात रियाज बुराउद्दिन शेख (वय ४०, रा. अंबड) याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला मूळची दिल्ली येथील असून उदरनिर्वाहासाठी नाशिकमध्ये आली होती. रविवार कारंजा परिसरात भाजी विक्रेता असलेल्या रियाज शेख याच्याशी तिची ओळख झाली. त्याने लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी जवळीक साधल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, संशयिताने महिलेचे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँकेचे पासबुक स्वतःकडे ठेवून तिची असहाय्यता वाढवली. त्यानंतर भद्रकाली परिसरातील एका लॉजवर नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोपही करण्यात आला आहे. याशिवाय, संशयिताने तिला इगतपुरी येथील एका धार्मिक स्थळी नेऊन गुलाबजल असल्याचे सांगत संशयास्पद द्रव पाजल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर अंबड येथील त्याच्या घरी नेऊन त्याच्या धर्माची प्रार्थना ऐकण्यास व धार्मिक ग्रंथ वाचण्यास भाग पाडले. तसेच कपाळावर टिकली लावण्यास मज्जाव केल्याने आपल्या धार्मिक भावना दुखावल्याचेही पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.

सततच्या कथित त्रासाला कंटाळून पीडितेने सरकारवाडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी संशयिताविरोधात गुन्हा नोंदवला असून त्याचा शोध सुरू आहे.

Comments are closed.