NGN News
Latest Marathi News

.. तर नगरसेवकांचे ६ महिने निलंबन : महापौर हिमगौरी आडके

  • महापालिका महासभेत घोषणा; नवीन नाशिक प्रभाग समिती बैठकीतील ‘त्या’ प्रकाराचा निषेध

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : नवीन नाशिक प्रभाग समितीच्या सुमारे चार वर्षांनी झालेल्या पहिल्याच सभेत दोन नगरसेवकांमधील अश्लाघ्य शिवीगाळ हा निंदनीय प्रकार असून त्यामुळे शहराची राज्यभर नाचक्की झाल्याची खंत महापौर हिमगौरी आडके यांनी आज महासभेत बोलून दाखवली. यापुढे प्रभाग अथवा महासभेत असा प्रकार घडल्यास संबंधितांचे सहा महिने निलंबन करण्यात येईल, अशी घोषणा महापौरांनी केली. सदर घोषणेचे सर्वपक्षीय नगरसेवकांनी टाळ्या वाजवून स्वागत केले.

नवीन नाशिक प्रभाग समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत पाणी टंचाई, गढूळ पाणी पुरवठा या विषयांवर गंभीर चर्चा सुरु असताना भाजप नगरसेवक सुधाकर बडगुजर आणि अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे यांच्यात प्रचंड वादावादी झाली होती. प्रकरण थेट शिव्यांची लाखोली वाहेपर्होयंत पोहचल्याने प्रभाग समितीच्या बैठकीतील वातावरण काही वेळ तणावाचे निर्माण झाले होते. इतर नगरसेवकांच्या हस्तक्षेपानंतर वातावरण निवळले. मात्र, समाज माध्यमांवर ते प्रचंड प्रमाणावर व्हायरल झाल्याने राज्यभर नाशिक शहराची नाचक्की झाली.

यासंदर्भात आज झालेल्या महापालिका महासभेत काही सदस्यांनी सोमवारच्या प्रकाराचा मुद्दा उपस्थित करून कडक पावले उचलण्याची सूचना केली. त्यावर भाष्य करताना महापौर हिमगौरी आडके यांनी प्रभाग समिती सभेत नगरसेवकांनी जनसामान्यांचे प्रश्न सोडवणे अपेक्षित आहे. तथापि, नवीन नाशिक प्रभाग समिती बैठकीत थेट नगरसेवकच परस्परांना शिवीगाळ करतात, हे अत्यंत निंदाजनक आणि दुर्दैवी आहे. त्या सभेत अनेक महिला नगरसेवक आणि अधिकारी उपस्थित आहेत, याचेही संबंधित नगरसेवकांनी भान ठेवले नाही. यापुढे कोणत्याही प्रभाग अथवा महासभेत असा प्रकार घडल्यास जे नगरसेवक शिवीगाळ अथवा आक्षेपार्ह शब्दांचा वापर करतील, त्यांचे पुढील सहा महिन्यांसाठी निलंबन करण्यात येईल. तसे करताना कोणाचाही मुलाहिजा बाळगला जाणार नाही, असा इशाराही महापौरांनी यावेळी दिला. त्यांच्या या निर्णयाचे सर्वपक्षीय नगरसेवकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.

महिला नगरसेवकांच्या नाराजीनंतर माफीनामा

सोमवारी नवीन नाशिक प्रभाग समिती बैठकीत दोन नगरसेवकांमध्ये झालेल्या शिवीगाळ प्रकरणी महिला नगरसेवकांनी उघड नाराजी बोलून दाखवली. सभागृहाचा नूर पाहता बडगुजर आणि शहाणे यांनी सभागृहाची माफी मागितली. शहाणे म्हणाले, मला कुणाचेही मन दुखवायचे नव्हते. मात्र झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. त्यानंतर त्यांनी सभागृहातून काढता पाय घेतला. सुधाकर बडगुजर यांनी देखील, माझ्या बोलण्याने कुणाच्या भावना दुखावल्या असतील पण सभागृहातील प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करतो असे सांगितले.

Comments are closed.