
- एसएमबीटीच्या ‘We CARE’ मूल्यांना ‘The Doctor as a Humanist संकल्पनेची जागतिक जोड
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : ‘सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः’ अर्थात सर्वजण सुखी होवोत आणि सर्वजण रोगमुक्त राहोत, या भारतीय तत्त्वज्ञानातून प्रेरणा घेत, एसएमबीटी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटर येथे एक आठवड्याचा विशेष शैक्षणिक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी बार्सिलोना, स्पेन येथील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वैद्यकीय शिक्षणतज्ज्ञ आणि मानवतावादी प्राध्यापक प्रा. जोनाथन मॅकफर्लंड उपस्थित होते. त्यांच्या भेटीमुळे एसएमबीटी आणि जागतिक संस्थांमधील आंतरराष्ट्रीय सहकार्य अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे. अलीकडच्या काळात अनेक ठिकाणी डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण होण्याच्या घटना घडताना दिसतात. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षणाच्या माध्यमातून हे नाते अधिक संवेदनशील, सुदृढ आणि विश्वासार्ह करण्यासाठी एसएमबीटीत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हा शैक्षणिक करार एसएमबीटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, युनिव्हर्सिटी पॉम्पेऊ फॅब्रा, बार्सिलोना आणि ‘The Doctor as a Humanist’ या संस्थांमध्ये करण्यात आला. आजच्या आधुनिक आणि तंत्रज्ञानाधिष्ठित वैद्यकीय क्षेत्रात रुग्णांप्रती दया, सहानुभूती आणि सेवाभाव टिकवून ठेवण्यासाठी ही जागतिक चळवळ कार्यरत आहे. प्रा. मॅकफर्लंड हे युनिव्हर्सिटी पॉम्पेऊ फॅब्रा येथे असोसिएट प्रोफेसर असून या जागतिक चळवळीचे संस्थापक-अध्यक्ष आहेत. त्यांच्या या भेटीमुळे दीर्घकालीन शैक्षणिक सहकार्याची भक्कम पायाभरणी झाली आहे.
या धोरणात्मक चर्चेचा एक महत्त्वाचा भाग म्हणून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘Humanism in Medicine’ या विषयावर विशेष अभ्यासक्रम तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम भारताच्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या नियमावली आणि गरजांनुसार तयार केला जाणार आहे. याशिवाय, दोन्ही संस्थांमध्ये संयुक्त संशोधन, शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम, आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यार्थी आणि शिक्षकांची देवाणघेवाण तसेच विशेष प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यावरही शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या सर्व उपक्रमांचा मुख्य उद्देश म्हणजे वैज्ञानिक अचूकता आणि नैतिक जबाबदारीची जाणीव असणारे डॉक्टर घडविणे हा आहे.
आपल्या दौऱ्यात प्रा. मॅकफर्लंड यांनी एसएमबीटीमधील डॉक्टर, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष मास्टरक्लास घेतला. या सत्रात त्यांनी डिजिटल युगातही रुग्णांशी जिव्हाळ्याचे, आपुलकीचे आणि विश्वासार्ह संबंध कसे टिकवून ठेवावेत, याबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी एसएमबीटीच्या नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी कॅम्पसला भेट देऊन मेडिकल, डेंटल, आयुर्वेद, नर्सिंग, फिजिओथेरपी आणि फार्मसी महाविद्यालयांतील विद्यार्थी व प्राध्यापकांशी संवाद साधला. तसेच, या सर्व संस्थांमध्ये सुरू असलेल्या शैक्षणिक आणि वैद्यकीय कार्याची सविस्तर माहिती घेतली. विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या जागतिक दर्जाच्या सुविधा आणि मानवी मूल्यांवर आधारित शिक्षणपद्धती पाहून त्यांनी विशेष आनंद व्यक्त केला.
स्थानिक पातळीवर दिल्या जाणाऱ्या आरोग्यसेवा समजून घेण्यासाठी प्रा. मॅकफर्लंड यांनी एसएमबीटीच्या एकदरे येथील ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्राला तसेच कोळवाडे येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आश्रमशाळेला भेट दिली. एसएमबीटीच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करताना त्यांनी सांगितले की, भारतातील मजबूत सामाजिक बंध आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा वैद्यकीय क्षेत्रात मानवतावादी दृष्टिकोन रुजविण्यासाठी जगभरासाठी एक आदर्श उदाहरण ठरू शकतो.
विविध विभागांतील विद्यार्थी आणि प्राध्यापकांशी संवाद साधताना प्रा. मॅकफर्लंड यांनी वैद्यकीय क्षेत्रातील वेगवेगळ्या शाखांमध्ये काम करताना रुग्णांशी भावनिक नाते कसे जोडावे, तंत्रज्ञानाचा वापर करताना मानवी स्पर्श कसा जपावा आणि आरोग्यसेवेतील विविध क्षेत्रांनी एकत्र येऊन रुग्णांची सर्वांगीण काळजी कशी घ्यावी, यावर मार्गदर्शन केले.
एसएमबीटीची मूल्ये अधिक दृढ होणार
उद्याचे डॉक्टर केवळ लॅब रिपोर्ट किंवा आधुनिक यंत्रांवर अवलंबून न राहता रुग्णांमधील माणूस ओळखणारे असावेत, ही भूमिका या उपक्रमातून प्रकर्षाने मांडण्यात आली. हा शैक्षणिक करार एसएमबीटीच्या ‘We CARE’ आरोग्य, सहानुभूती, सातत्याने शिकण्याची वृत्ती, आदर आणि व्यावसायिकता या मूलतत्त्वांना अधिक बळकटी देणारा ठरणार आहे. उत्तम उपचारांसोबतच रुग्णांना सहानुभूती आणि भावनिक आधार देणारे डॉक्टर घडविणे, हा या उपक्रमाचा प्रमुख हेतू आहे. या दौऱ्याच्या शेवटी, एसएमबीटी आणि जागतिक संस्थांनी मिळून वैद्यकीय क्षेत्रात मानवतावादी विचारपद्धती सातत्याने पुढे नेण्याचा तसेच जागतिक पातळीवर सक्षम आणि स्थानिक गरजांशी जोडलेले डॉक्टर घडविण्याचा संकल्प व्यक्त केला.
डॉ. मीनल मोहगावकर,
संचालक, शिक्षण
एसएमबीटी सेवाभावी ट्रस्ट
ग्रामीण भागात एसएमबीटीचे कार्य अतुलनीय
एसएमबीटी संस्थेने ग्रामीण आणि आदिवासी भागात ज्या पद्धतीने आरोग्यसेवांचे जाळे निर्माण केले आहे, ते खरोखरच कौतुकास्पद आहे.भारतातील लोकांमध्ये असलेले कौटुंबिक आणि सामाजिक बंध अत्यंत घट्ट आहेत. हाच समृद्ध सांस्कृतिक वारसा वैद्यकीय क्षेत्रात मानवतावादी दृष्टिकोन रुजविण्यासाठी जगभरासाठी एक आदर्श उदाहरण ठरू शकतो. आयुर्वेद हॉस्पिटल भेटीत मी स्वत: भारतीय आयुर्वेद उपचारांचा अनुभव घेतला. शिरोधारा करून घेत आयुर्वेदाचे महत्व जाणून घेतले. येणाऱ्या काळात आयुर्वेदाला आणखी चांगले दिवस येतील यात शंका नाही. एसएमबीटीसोबत शैक्षणिक करार करून भारतातील या संस्कृतीच्या माध्यमातून वैद्यकीय शिक्षणाला नवी दिशा देण्याचा माझा प्रयत्न असेल.
प्रा. जोनाथन मॅकफर्लंड
वैद्यकीय शिक्षणतज्ज्ञ आणि मानवतावादी प्राध्यापक
बार्सिलोना, स्पेन
Comments are closed.