NGN News
Latest Marathi News

‘हरित नाशिक’ लोकचळवळ व्हावी : गिरीश महाजन

  • मिशन ग्रीन मॉन्सून अभियानांतर्गत एक लाख वृक्ष लागवड मोहीम सुरू

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : वाढते तापमान, अल निनोचे संकट आणि पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण आवश्यक आहे. त्यासाठी ‘हरित नाशिक’ उपक्रम ही लोकचळवळ व्हावी. या चळवळीत प्रत्येक नागरिकाने आपले योगदान द्यावे, असे आवाहन कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी येथे केले.

‘उन्नत नाशिक अभियान’ आणि नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर आणि परिसरात ‘हरित कुंभ – हरित मॉन्सून’ उपक्रम 28 जून ते 25 ऑक्टोबर 2026 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर आज फाशीचा डोंगर परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर हिमगौरी आडके-आहेर, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समितीचे सभापती मच्छिंद्र सानप, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य वनसंरक्षक गजेंद्र हिरे, नगरसेवक श्याम बडोदे, दिनकर पाटील, अमोल पाटील, आदी उपस्थित होते.

मंत्री महाजन म्हणाले की, नाशिक शहरात ‘उन्नत नाशिक अभियान’ राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज सकाळी कपिला नदी महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. यापूर्वी नंदिनी नदी स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमीच स्वच्छतेसाठी आग्रही असतात. त्यामुळे प्रत्येकाने स्वच्छतेसाठी आपले योगदान दिले पाहिजे.

गोदावरी, नंदिनी आणि कपिला या नद्या नाशिक शहराचे वैभव आहेत. या वैभवाचे पावित्र्य राखण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. नागरिकांनी हरित नाशिकसाठी आपले योगदान दिले पाहिजे. कचऱ्याचे वर्गीकरण केले पाहिजे. रस्त्यावर कचरा टाकू नये. मध्य प्रदेशातील इंदूर शहराच्या धर्तीवर आपण स्वच्छता राखली पाहिजे. तसे केले तर आपला परिसर, शहर, राज्य आणि देश स्वच्छ ठेवण्यास मदत होईल.

मिशन ग्रीन मॉन्सून अभियानांतर्गत एक लाख रोपांची लागवड करण्यात येईल. त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी नागरिकांनी घ्यावी. आगामी कुंभमेळा स्वच्छ, हरित आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून विविध उपाययोजना सुरू आहेत. गोदावरी नदी बारमाही आणि स्वच्छ करण्यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून मलजल शुद्धीकरण प्रकल्प राबविण्यात येत आहे. रस्त्यांची कामे सुरू आहेत. या माध्यमातून वाहतूक सुरळीत होईल.

यंदा अल निनोचे संकट जाणवत आहे. त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असेही आवाहन मंत्री श्री. महाजन यांनी केले. प्रारंभी दिनकर पाटील यांनी वृक्षारोपण मोहिमेची माहिती दिली. संदीप जाधव आणि शेखर गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले.

कपिला नदी महास्वच्छता अभियान

तत्पूर्वी, नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरण आणि महानगरपालिका यांच्या वतीने आज सकाळी कपिला नदी महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, महापौर हिमगौरी आडके-आहेर, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समितीचे सभापती मच्छिंद्र सानप, आयुक्त मनीषा खत्री, पंचवटी प्रभाग सभापती रोहिणी पिंगळे, नगरसेविका प्रियंका धनंजय माने, नगरसेविका जुई शिंदे, नगरसेवक गौरव गोवर्धने, अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, चौधरी साहेब, शहर अभियंता संजय अग्रवाल, कार्यकारी अभियंता प्रशांत पगार, एन. आर. राजपूत, साताळकर साहेब, मैद साहेब, आरोग्य अधिकारी आवेश पलोड, पंचवटी आरोग्य अधिकारी संजय दराडे, पंचवटी विभागीय अधिकारी राहुल जाधव, उद्यान विभागाचे वेताळ, सुनील थळकर तसेच मनपाचे अधिकारी, कर्मचारी आणि नाशिक शहरातील असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, प्रदीप चौधरी, उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांच्यासह एनसीसीचे विद्यार्थी, नागरिक आदींनी स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. तसेच हिरवाडी परिसरात मंत्री श्री. महाजन यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

Comments are closed.