
- सिन्नरमधील ज्वालामाता कार्यालय येथे आयोजन
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : शिवसेना फुटीनंतर उद्भवलेल्या राजकीय घडामोडींमध्ये आपल्या भूमिकेमुळे चर्चेत आलेले खासदार राजाभाऊ वाजे यांचा येत्या रविवारी (दि. २८ ) सिन्नर येथे नागरी सत्कार करण्यात येणार आहे. सिन्नर तालुका व नाशिक जिल्ह्यातील नागरिकांच्या वतीने आयोजित या सोहळ्यामुळे राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उत्सुकता निर्माण झाली आहे.
राजकीय उलथापालथीच्या काळात अनेक नेत्यांप्रमाणे खासदार राजाभाऊ वाजे यांच्यापुढेही विविध राजकीय प्रस्ताव आल्याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात रंगली होती. मंत्रीपद, विकासनिधी आणि कोट्यवधी रुपयांच्या ऑफरसह विविध आमिषे देण्यात आल्याच्या चर्चा सुरू असतानाही त्यांनी पक्षाशी आणि आपल्या राजकीय भूमिकेशी तडजोड न करता निष्ठावंत राहण्याचा निर्णय घेतला. याच पार्श्वभूमीवर आता सिन्नरमध्ये आयोजित करण्यात आलेला नागरी सत्कार हा विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सिन्नर तालुक्यातील विविध सामाजिक संस्था, व्यापारी संघटना, युवक मंडळे तसेच सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून एका लोकप्रतिनिधीच्या निष्ठावंत भूमिकेचा गौरव करण्यासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवर एकत्र येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. सिन्नरमधील ज्वालामाता कार्यालय येथे रविवारी दुपारी ४ वाजता हा भव्य सोहळा पार पडणार आहे.
Comments are closed.