NGN News
Latest Marathi News

जागतिक बालकामगार विरोधी दिन साजरा

  • पथनाट्य, जनजागृती रॅली तसेच चर्चासत्राचे आयोजन

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त जिल्हा महिला व बाल विकास विभाग, कामगार उपयुक्त कार्यालय नाशिक, रेल्वे चाईल्ड हेल्प लाईन, अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ आणि, जस्ट राईट फॉर चिल्ड्रेन, विपला फाउंडेशन, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

या अभियानाअंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समिती, नाशिक येथे बालकामगार प्रथेचे दुष्परिणाम, बालहक्कांचे संरक्षण आणि शिक्षणाचे महत्त्व याबाबत जनजागृती करण्यासाठी पथनाट्य, जनजागृती रॅली तसेच चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिक, व्यापारी आणि कामगारांना बालकामगारमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले.

तसेच नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथे पथनाट्य, पोस्टर प्रदर्शन, स्वाक्षरी मोहीम आणि जनजागृती सत्राद्वारे व्यापक जनजागृती करण्यात आली. रेल्वे स्थानक परिसरातील प्रवासी, नागरिक आणि विक्रेत्यांना बालकामगार प्रतिबंध, बाल संरक्षण तसेच संकटग्रस्त बालकांसाठी उपलब्ध विविध सेवांबाबत माहिती देण्यात आली.

यावेळी बालकामगार निर्मूलनासाठी शासन यंत्रणा, स्वयंसेवी संस्था आणि समाजातील सर्व घटकांनी एकत्रितपणे कार्य करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. “मुलांच्या हातात काम नव्हे, तर शिक्षणाची पुस्तके असावीत” हा संदेश विविध उपक्रमांद्वारे प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचविण्यात आला.

कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, स्वयंसेवक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बालकामगारमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी अशा जनजागृती उपक्रमांची नितांत आवश्यकता असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. यावेळी प्रमुख उपस्तीती जिल्हा महिला व बाल विकास विभाग, बाल कल्याण समिती,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, कामगार उपआयुक्त कार्यालय, चाईल्ड हेल्पलाईन, अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ, विपला फाउंडेशन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Comments are closed.