
- पळवाटा संपल्या; उद्या शरण येण्याची शक्यता
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : बहुचर्चित टीसीएस कंपनी धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान हिचा आश्रयदाता ठरलेला एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल यास नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेने दणका दिला आहे. पोलिसांनी मातीन यास नोटीस पाठवून कारवाईचा बडगा उगारला आहे. प्राप्त माहितीनुसार, मतीन याने नोटीस मिळताच पोलिसांना शरण येण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी सोमवारचा दिवस निश्चित केला आहे.
सर्वत्र खळबळ उडवून देणाऱ्या नाशिकमधील ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणाचे थेट कनेक्शन छत्रपती संभाजीनगरशी असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान हिला पोलिसांपासून लपवून ठेवण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आश्रय दिल्याप्रकरणी, एमआयएम नगरसेवक मतीन पटेल याच्याभोवती पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. मतीन पटेल याच्या विरोधात आरोपीला आश्रय दिल्याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या शोधार्थ नाशिक पोलीस पथक संभाजीनगरमध्ये गेले होते मात्र, तो मिळून आला नव्हता. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर पथकाने पटेल यास नोटीस बजावल्यानंतर मात्र त्याने नरमाईची भूमिका स्वीकारली. निदा खानला आश्रय देणे त्यास चांगलेच महागात पडले आहे. आधी घरावर, पाठोपाठ ऑफीसवर आणि लगोलग निदा खान लपलेली त्या ठिकाणी संभाजीनगर महानगरपालिकेने कारवाई करून मतीन यास जेरीस आणले. आता नोटीस मिळाल्यानंतर कोणतीही पळवाट न उरल्याने, सोमवारी पटेल स्वतःहून नाशिक पोलिसांसमोर शरण येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Comments are closed.