
वयाच्या ८३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; उद्या सकाळी ९ वाजता होणार अंत्यसंस्कार
** एनजीएन न्यूज नेटवर्क
मौजे सुकेणे / नाशिक : दक्षिण महाराष्ट्रातील प्रति गाणगापूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महानुभाव पंथीय श्रीक्षेत्र मौजे सुकेणे (ता. निफाड) येथील श्रीदत्त मंदिर संस्थानचे प्रमुख आचार्य प्रवर महंत परमपूज्य श्री सुकेणेकर बाबा शास्त्री (८३) यांचे बुधवारी (दि.२०) अल्पशा आजाराने निधन झाले. महानुभाव पंथीय संत महंत यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी (दि.२१) सकाळी ९ वाजता मौजे सुकेणे (ता. निफाड) येथील महानुभाव पंथीय स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
श्री सुकेणेकर बाबा शास्त्री यांच्या निधनाने कसबे सुकेणे पंचक्रोशी सह जिल्ह्यात दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ते अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे पंधरा वर्षापासून उपाध्यक्ष होते. दहा वर्षांपूर्वी त्यांचे गुरु महंत मोठे बाबा सुकेणेकर यांच्या निधनानंतर त्यांना महंत सुकेणेकर ही पदवी प्राप्त होऊन ते श्रीदत्त मंदिर संस्थान प्रमुख म्हणून विराजमान झाल होते. त्यांचे मूळ नाव मनोहर अपसुंदे होते, रासेगाव (ता. दिंडोरी) येथे जन्म झाल्यानंतर लहानपणापासूनच त्यांनी मौजे सुकेणे येथील दत्त मंदिरात महानुभाव पंथीय दीक्षा स्वीकारून आयुष्यभर महानुभाव पंथाचे आचार विचार व प्रसार करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली.
दोन महिन्यापूर्वी सातत्याने प्रवास करत असताना त्यांची तब्येत खालावत गेली. महानुभाव पंथीयांच्या आचार्य प्रवर, उपाध्य कुलभूषण, परमपूज्य, महंत सुकेणेकर , महाराज , शास्त्री यांसह अनेक पदव्या त्यांना प्राप्त झाल्या होत्या. शिवाय महाराष्ट्र शासनाचे अनेक पुरस्कार देखील त्यांना प्राप्त झाले होते. श्री दत्त मंदिराला शासनाच्या क वर्ग तीर्थक्षेत्र विभागातून ब वर्गामध्ये आणण्यास त्यांचा मोलाचा सहभाग राहिला. महंत शास्त्री बाबा काळाच्या पडद्याआड गेल्याने महानुभाव पंथीयांचे मोठे नुकसान झाल्याची प्रतिक्रिया माजी आमदार बाळासाहेब सानप, दत्ता गायकवाड, प्रकाश नन्नावरे, मविप्रचे उपसभापती डी. बी. मोगल यांनी दिली
Comments are closed.