
- सिन्नर ग्रामीण आणि ESIC रुग्णालय पण लवकरच येणार पूर्णत्वास
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्यसेवा अधिक सक्षम आणि सर्वसामान्य नागरिकांना वेळेवर वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची अशी मोठी घडामोड घडली असून वावी येथील ग्रामीण रुग्णालयाला अखेर शासनाची अधिकृत मंजुरी प्राप्त झाली आहे. विशेष म्हणजे, या मंजुरीसाठी नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी तब्बल दीड वर्ष शासन स्तरावर पाठपुरावा केला होता.
ग्रामीण भागातील नागरिकांना अत्यावश्यक वैद्यकीय सेवा मिळवण्यासाठी अनेकदा जिल्हा मुख्यालय किंवा शहरांकडे धाव घ्यावी लागत होती. अपघात, प्रसूती, हृदयविकार, तापसदृश संसर्गजन्य आजार तसेच इतर तातडीच्या उपचारांसाठी वेळेअभावी अनेक रुग्णांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. ही गंभीर बाब लक्षात घेत खासदार वाजे यांनी संबंधित विभागाकडे वारंवार पाठपुरावा करत ग्रामीण रुग्णालयाच्या मंजुरीचा प्रश्न प्राधान्याने मांडला होता.
यासाठी आरोग्य विभाग, मंत्रालय तसेच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत सातत्याने बैठका घेण्यात आल्या. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, जागेची उपलब्धता, लोकसंख्येचा वाढता ताण, परिसरातील आरोग्य सुविधांची कमतरता यांसारख्या सर्व बाबींचा सविस्तर अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला होता. अखेर या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आले असून वावी ग्रामीण रुग्णालयाला अधिकृत मंजुरी प्राप्त झाली आहे.
या मंजुरीमुळे परिसरातील हजारो नागरिकांना दर्जेदार आणि तातडीच्या आरोग्य सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहेत. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, कामगार आणि दुर्गम भागातील नागरिकांना याचा मोठा लाभ होणार असल्याची भावना स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे. वावी ग्रामीण रुग्णालयाच्या मंजुरीनंतर परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिक, सामाजिक संस्था आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून खासदार वाजे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे कौतुक करण्यात येत आहे.
——–
“ग्रामीण भागातील नागरिकांना मूलभूत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे. सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने हे रुग्णालय अत्यंत आवश्यक होते. नागरिकांच्या या दीर्घकालीन मागणीला न्याय मिळाल्याचा आनंद असून, पुढील काळातही नाशिक लोकसभा मतदारसंघातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील.” : राजाभाऊ वाजे, खासदार, नाशिक
सिन्नर ग्रामीण व ESIC लवकरच
वावी ग्रामीण रुग्णालयासोबतच सिन्नर येथील रुग्णालयाची क्षमता १०० खाटा ची करण्याचा प्रस्ताव पाठपुरवठ्यात आहे तसेच कामगारांच्या ESIC रुग्णालय देखील लवकरच पूर्णत्वास येणार आहे. यासह त्र्यंबकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयाची देखील क्षमता वाढवण्यासाठी खासदार राजाभाऊ वाजे प्रयत्नशील असून त्यासाठी जोरदार पाठपुरावा सुरू आहे.
Comments are closed.