
- पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून बजाज समूहाच्या राष्ट्रनिर्मितीतील योगदानाचे कौतुक
- US$ १४८ अब्ज इतक्या मार्केट कॅपसह भारतातील सर्वात मोठ्या उद्योग समूहांपैकी एक असलेला बजाज समूह, ऑटोमोबाईल, आर्थिक सेवा, ग्राहक उपयोज्य विद्युत उपकरणे आणि इंजिनिअरिंग या क्षेत्रांच्या माध्यमातून भारतातील प्रत्येक ३ पैकी १ घराला आपली सेवा देत आहे.
- बजाज समूहाची पाळेमुळे त्याचे संस्थापक जमनालाल बजाज यांच्याशी जोडलेली आहेत. जमनालाल बजाज हे स्वातंत्र्यसेनानी, समाजसुधारक, परोपकारी, उद्योगपती आणि महात्मा गांधींचे ‘पाचवे मानसपुत्र’ मानले जात असत. त्यांनी १९२६ मध्ये मुंबईत (तत्कालीन बॉम्बे) समूहाचे पहिले कार्यालय स्थापन केले.
मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क
भारतातील सर्वात जुन्या कौटुंबिक व्यवसायांपैकी एक आणि १४८ अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या मार्केट कॅपसह सर्वात मोठ्या समूहांपैकी एक असलेल्या बजाज समूहाने आज आपल्या व्यवसायाची १०० वर्षे पूर्ण केली. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी या ऐतिहासिक टप्प्यावर आपल्या शुभेच्छा दिल्या. हा टप्पा भारताच्या स्वतःच्या प्रवासाचा – स्वातंत्र्यलढ्यापासून ते जागतिक आर्थिक महासत्ता होण्यापर्यंतचा आरसा आहे. १९२६ मध्ये मुंबईत जमनालाल बजाज यांनी स्थापन केलेला हा समूह आज दर तीन भारतीय घरांपैकी एका घरापर्यंत पोहोचला असून त्यात १,३०,००० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.
१०० हून अधिक कंपन्या, १०० हून अधिक देशांमध्ये निर्यात आणि आरोग्यसेवा (हेल्थकेअर) क्षेत्रात होणारे आगामी पदार्पण यासह बजाज समूहाने ऑटोमोबाईल, आर्थिक सेवा आणि इंजिनिअरिंग क्षेत्रात भारतातील सर्वात विश्वासार्ह ब्रँड्सपैकी एक निर्माण केला आहे. यामध्ये बजाज ऑटो, बजाज फिनसर्व्ह, बजाज होल्डिंग्स अँड इन्व्हेस्टमेंट, बजाज फायनान्स, बजाज हाउसिंग फायनान्स, बजाज इलेक्ट्रिकल्स आणि मुकंद यांसारख्या सूचिबद्ध कंपन्यांचा समावेश आहे.
राष्ट्रनिर्मितीमध्ये बजाज समूहाच्या योगदानाची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजाज परिवाराला दिलेल्या संदेशात म्हटले आहे की, “बजाज समूहाच्या शताब्दी निमित्त, मी या प्रवासाशी जोडल्या गेलेल्या प्रत्येकाचे अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. १०० वर्षांचा प्रवास हा कोणत्याही संस्थेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असतो. हे केवळ दीर्घायुष्याचे प्रतीक नसून बदलत्या काळानुसार स्वतःला जुळवून घेण्याच्या, आर्थिक विकासात योगदान देण्याच्या आणि पिढ्यानपिढ्या आपली प्रासंगिकता टिकवून ठेवण्याच्या क्षमतेचे दर्शन घडवते.”
“श्री जमनालाल बजाज यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेला बजाज समूह आपल्या देशाच्या विकासाच्या अनेक टप्प्यांवर भारताच्या औद्योगिक आणि आर्थिक परिदृश्याचा अविभाज्य भाग राहिला आहे. आज हा समूह एक वैविध्यपूर्ण कंपनी म्हणून विस्तारला असून भारत आणि जगभरातील ग्राहकांना सेवा देत आहे.”
“गेल्या अनेक दशकांपासून बजाज समूहाने रोजगार निर्मिती, नाविन्यपूर्ण संशोधन आणि समुदाय विकासाला पाठिंबा देऊन राष्ट्रनिर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अशा प्रकारचे मैलाचे दगड हे केवळ मागील योगदानाचे स्मरण करण्याचीच नव्हे, तर विकास, शाश्वतता आणि सर्वसमावेशक प्रगतीसाठीची आपली वचनबद्धता पुन्हा दृढ करण्याची संधी असतात.”
“भारत आज उत्पादन, नवोपक्रम आणि जागतिक स्पर्धात्मकतेमध्ये नवीन आकांक्षांसह पुढे जात आहे. बजाज समूहासारख्या खोलवर मुळे आणि प्रदीर्घ अनुभव असलेल्या संस्थांना २०४७ पर्यंतच्या ‘विकसित भारत’ प्रवासाला आकार देण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडायची आहे. या अविस्मरणीय प्रसंगी पुन्हा एकदा शुभेच्छा. मला खात्री आहे की आगामी वर्षे निरंतर प्रगतीची आणि देशाच्या विकासात अर्थपूर्ण योगदानाची असतील.”
बजाज समूहाच्या सामाजिक प्रभावाच्या प्रयत्नांनी – ज्यात युवक कौशल्य, रोजगार, बाल आरोग्य, शिक्षण आणि संरक्षण यावर लक्ष केंद्रित केले आहे तसेच १ कोटीहून अधिक लाभार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. मुंबईतील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया येथे आयोजित शताब्दी सोहळ्याला कुटुंबातील सदस्य, उद्योजक, केंद्रीय आणि राज्य मंत्री, राजकीय नेते आणि नामांकित व्यक्ती उपस्थित होत्या. या संध्याकाळी बजाज परिवाराचा स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग, व्यापाराकडून उत्पादनाकडे आणि आर्थिक सेवांकडे झालेला प्रवास, आणि आजच्या आधुनिक तंत्रज्ञानापर्यंतचा
प्रवास उलगडून दाखवण्यात आला.
या कार्यक्रमाची प्रमुख आकर्षणे म्हणजे बजाज परिवाराचे संबोधन, ग्रॅमी पुरस्कार विजेते रिकी केज आणि त्यांच्या चमूचा विशेष सादरीकरण, राजकुमार हिराणी दिग्दर्शित जमनालाल बजाज आणि महात्मा गांधी यांच्यावरील ‘कथनी करणी एकसी’ या लघुपटाचे स्क्रीनिंग आणि ‘१०० इयर्स ऑफ बजाज’ या लोगोचे अनावरण होते. या प्रसंगी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.
यावेळी बजाज ऑटोचे अध्यक्ष नीरज बजाज म्हणाले की, “आमच्या कुटुंबाच्या वतीने आम्ही माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींचे त्यांच्या शुभेच्छांबद्दल आभार मानतो. बजाज आणि भारताची कहाणी कधीच वेगळी राहिलेली नाही. भारताचा स्वावलंबनाचा प्रवास अलीकडे सुरू झालेला नाही; तो शंभर वर्षांपूर्वीच सुरू झाला होता – जेव्हा दूरदृष्टी असलेल्या भारतीयांनी असा विश्वास धरला की भारताने स्वतःसाठी निर्माण केले पाहिजे आणि स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे. आमचे संस्थापक जमनालालजी हे त्यापैकीच एक अग्रदूत होते. ‘वैयक्तिक फायद्यापेक्षा सार्वजनिक हिताला प्राधान्य’ या त्यांच्या तत्त्वज्ञानाने आमच्या अनेक पिढ्यांचे निर्णय घडवले आहेत.”
बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी ‘जागतिकीकरण’ या विषयावर आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की, “आम्ही जे बोलतो आणि जे करतो ते नेहमी सारखेच असले पाहिजे. कदाचित म्हणूनच बजाजचा प्रवास ही केवळ विकासाची कथा न ठरता विश्वासाची कथा बनली. आज बजाज ऑटो ही केवळ भारताचीच नव्हे, तर जगातील पहिल्या
तीन दुचाकी कंपन्यांपैकी एक आहे. आमची वाहने आफ्रिका, लॅटिन अमेरिका आणि आग्नेय आशियातील १०० हून अधिक देशांत विकली जातात. आजचा भारत केवळ जागतिक अर्थव्यवस्थेत सहभागी होत नाही, तर तो स्पर्धाही करत आहे.”
बजाज इंटिग्रेटेड हेल्थ सिस्टीमचे सीईओ नीरव बजाज यांनी ‘सर्वसमावेशक विकास’ या विषयावर आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की, “जमनालालजींचा असा विश्वास होता की व्यवसाय हा समाजापेक्षा वेगळा नसतो. व्यवसायाचा उद्देश गरिबांचा फायदा करणे हा असावा. ‘बजाज बियॉन्ड’ हा उपक्रम आमच्या १०० वर्षांच्या याच तत्त्वज्ञानाची पुढची अभिव्यक्ती आहे. येत्या ५ वर्षात २ कोटी तरुण भारतीयांवर प्रभाव टाकण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”
बजाज फिनसर्व्हचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज यांनी ‘भारत आणि पुढील १०० वर्षे’ या विषयावर आपले मांडले. ते म्हणाले की, “माझे वडील राहुल बजाज नेहमी म्हणायचे – माझा ‘आयडिया ऑफ इंडिया’वर आणि येथील
तरुण पिढीवर ठाम विश्वास आहे. भारताच्या प्रगतीचा पुढचा अध्याय तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण संशोधनाद्वारे लिहिला जाईल. बजाजमध्ये आम्ही AI कडे केवळ एक तंत्रज्ञान म्हणून पाहत नाही, तर ती आर्थिक समावेशनासाठी एक शक्तिशाली शक्ती असल्याचे मानतो.”
बजाज इलेक्ट्रिकल्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर बजाज म्हणाले की, “जमनालालजींचे कार्य सामाजिक समता, महिला आणि मुलांचे शिक्षण, ग्रामीण उत्थान आणि खादीच्या प्रसारापर्यंत विस्तारलेले होते. यश हे केवळ आकड्यांत मोजावे की आपण किती लोकांच्या जीवनाला स्पर्श केला आणि कोणती मूल्ये जपली यावर? पुढील १०० वर्षांत या प्रश्नाचे उत्तरच आमची संस्था परिभाषित करेल.”
Comments are closed.