NGN News
Latest Marathi News

मविप्र रुग्णालयात होणार विनामूल्य किडनी, लिव्हर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

  • सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांची माहिती

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या आडगांव येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्रामध्ये आता किडनी आणि लिव्हर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होणार असून, नुकतीच आईने मुलाला दिलेली किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. विशेष म्हणजे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य या दोन्ही योजनांच्या अंतर्गत या शस्त्रक्रिया विनामूल्य होणार आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील सर्वसामान्य रुग्णांसाठी दिलासादायी बाब असून, जास्तीत जास्त रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे व कार्यकारिणी मंडळाने पत्रकार परिषदेत केले.

      याप्रसंगी मविप्रचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी, संचालक ॲड. लक्ष्मण लांडगे, संचालक रमेश पिंगळे, शिक्षणाधिकारी डॉ. डी डी. लोखंडे, प्रा. शशिकांत मोगल, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर भामरे, किडनी प्रत्यारोपण समन्वयक डॉ. संजय रकिबे, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. मंगेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

    ॲड. ठाकरे म्हणाले, मविप्र रुग्णालयात मूत्रपिंड (किडनी) प्रत्यारोपण विभाग पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाला आहे. येथे अत्याधुनिक डायलिसिस युनिटसह तज्ज्ञ नेफ्रॉलॉजिस्ट आणि मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया तज्ज्ञ, भूलतज्ञ व प्रशिक्षित कर्मचारी वर्ग सेवेत दाखल झाला आहे. या महागड्या शस्त्रक्रिया ‘महात्मा ज्योतिराव  फुले जनआरोग्य’ आणि ‘प्रधानमंत्री  आयुष्यमान भारत अशा शासकीय योजनांच्या माध्यमातून पूर्णपणे मोफत केल्या जात आहेत. मविप्र रुग्णालयात लवकरच यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याचादेखील मानस आहे. तसेच, स्पोर्ट फ़िजिओथेरपी, होमिओपॅथी हे विभागदेखील लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

नाव नोंदणीचे आवाहन

ज्या रुग्णांना मूत्रपिंड प्रत्यारोपणाची गरज आहे, परंतु रक्ताच्या नात्यातील दाता किंवा जवळचा दाता उपलब्ध होत नाही, अशा रुग्णांनी ‘झेडटीसीसी’कडे (ZTCC) नाव नोंदणी करावी. अशा रुग्णांना मेंदूमृत रुग्णांकडून मिळणारे मूत्रपिंड उपलब्ध होऊ शकतात. त्यासाठी मविप्र रुग्णालय पूर्ण सहकार्य करेल. समाजाने मेंदू मृत्यूनंतर अवयव दानासाठी पुढे यावे, यासाठी रुग्णालयामार्फत मोठ्या प्रमाणावर जनजागृती व समुपदेशन केले जात असल्याची माहिती ॲड.ठाकरे यांनी दिली.

सुपर स्पेशलिटी कोर्सेस सुरू करणार

ग्रामीण आणि शहरी भागातील रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा मिळावी, या उद्देशाने महाविद्यालयात लवकरच सुपर स्पेशलिटी कोर्सेस  सुरू करण्याची कार्यवाहीदेखील सुरू करण्यात आली आहे. ‘जागा वाढल्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना डॉक्टर होण्याची संधी मिळेल. तसेच नवीन कोर्सेसमुळे आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यास मदत होईल,असेही ॲड. ठाकरे यांनी सांगितले.

‘त्या’ कुटुंबाला मदतीचा हात

मविप्र रुग्णालयात गेल्या आठवड्यात घडलेल्या दुर्घटनेतील मृत महिलेच्या कुटुंबियांना मविप्रने मदतीचा हात पुढे केला आहे. तात्काळ मदत म्हणून माविप्रकडून १ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला जाणार आहे. पीएफच्या माध्यमातून ६ हजार रुपये पेंशांदेखील सुरु केली जाणार आहे. कुटुंबातील वारसाला नोकरी देण्यासाठीदेखील प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती सरचिटणीस ॲड. ठाकरे यांनी दिली.

Comments are closed.