NGN News
Latest Marathi News

एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये कर्करोग निदानाच्या मोफत तपासण्या

  • कॅन्सर सदृश्य लक्षणं असलेल्या सर्वांनाच होणार लाभ; २५ हजारांपर्यंत अर्थसहाय्य

नाशिक | एनजीएन न्यूज नेटवर्क

कर्करोगाचा (कॅन्सर) धोका सातत्याने वाढत असतानाच या आजारावरील सर्वात मोठा अडसर आजही लवकर निदानासाठी लागणारा खर्च ठरत असल्याचे दिसून येते. भारतात कर्करोगाची लक्षणे असलेल्या सुमारे ६० टक्क्यांहून अधिक रुग्णांकडे प्राथमिक तपासण्यांसाठी आवश्यक पैसे नसतात, तर महाराष्ट्रातही हीच परिस्थिती असून सुमारे ५५ ते ६० टक्के रुग्ण आर्थिक कारणांमुळे निदानास विलंब करत असल्याचे दिसून येते. परिणामी, अनेक रुग्ण तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात उपचारासाठी दाखल होतात. ही गंभीर बाब लक्षात घेऊन इगतपुरी तालुक्यातील नंदी हिल्स येथील एसएमबीटी हॉस्पिटलच्या कॅन्सर इन्स्टिट्युटमध्ये कर्करोग निदानासाठी लागणाऱ्या तपासण्या मोफत करण्यात आल्या आहेत.

कर्करोग सदृश्य लक्षणे असलेल्या रुग्णांना २५ हजार रुपयांपर्यंतच्या तपासण्या पूर्णतः मोफत केल्या जात असून, या सुविधेचा लाभ आतापर्यंत हजारो रुग्णांनी घेतल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाकडून देण्यात आली आहे. ही सेवा सोमवार ते शनिवार उपलब्ध आहे. रुग्ण थेट बाह्यरुग्ण विभागात किंवा आदिवासी व दुर्गम भागात आयोजित आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून प्राथमिक तपासणी करून हॉस्पिटलमध्ये या तपासण्यांसाठी लाभ घेत असल्याचेही सांगण्यात आले आहे.

मुंबईच्या प्रख्यात टाटा मेमोरियल हॉस्पिटलसोबत झालेला करार आणि याठिकाणी पूर्णवेळ उपलब्ध असलेले टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे तज्ञ डॉक्टर्स यामुळे एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कर्करोग उपचार सुविधा ग्रामीण भागातच उपलब्ध झाल्या आहेत. एसएमबीटी कॅन्सर इन्स्टिटयूटमध्ये टाटा मेमोरियलच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टरांची अनुभवी टीम कार्यरत आहे. यामध्ये मेडिकल ऑन्कोलॉजीसाठी डॉ. संदीप इशी, सर्जिकल ऑन्कोलॉजीसाठी डॉ. विनायक शेनगे व डॉ. अंबरीश चॅटर्जी, बालरोग कर्करोगासाठी डॉ. पिंकी शाह–काळे, तर हेमॅटो ऑन्कोलॉजीसाठी (ब्लड कॅन्सर) डॉ. गिरीश बदरखे सेवा देत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजवर हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार व शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

एसएमबीटी हॉस्पिटलच्या वतीने ग्रामीण आणि आदिवासी भागातील नागरिकांचे आरोग्य सुधारण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. या भागात कर्करोग निदानासाठी लागणाऱ्या रक्त तपासण्या, बायोप्सी, सीटी स्कॅन, एमआरआय अशा तपासण्यांचा खर्च अनेकांना परवडत नसल्याने निदान उशिरा होत होते. मात्र, एसएमबीटीच्या आरोग्य शिबिरांमधून आणि रुग्णालयातील मोफत तपासणी योजनेमुळे कर्करोगाची लक्षणे असलेले रुग्ण वेळेत शोधण्यात यश मिळत असून, त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करता येत आहेत.

याठिकाणी केवळ सामान्य कर्करोगच नव्हे, तर रक्तविकार कर्करोगांवर मायलोमा आणि ल्युकेमिया उपचार केले जात आहेत. खर्चिक मानल्या जाणाऱ्या बोन मॅरो ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया अल्पदरात केल्या जात असून, आधुनिक उपचारपद्धतींपैकी एक असलेली कार-टी सेल थेरपी देखील येथे अल्पदरात उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधा स्थानिक पातळीवर मिळाल्याने रुग्णांची मोठी गैरसोय टळली आहे.

ग्रामीण भागातील रुग्णांना मोफत व अल्पदरात दर्जेदार कर्करोग उपचार उपलब्ध करून देत, एसएमबीटी हॉस्पिटलने वैद्यकीय क्षेत्रात एक विश्वासार्ह आणि दिलासादायक केंद्र म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. विशेषतः कर्करोग सदृश्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी २५ हजार रुपयांपर्यंतच्या तपासण्या मोफत करून, लवकर निदान आणि वेळेत उपचाराचा मार्ग खुला केला आहे. लवकर निदान झालेला कुठलाही कर्करोग बरा होतो यासाठी हॉस्पिटल प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. विशेष म्हणजे २६ पेक्षा अधिक सुपर स्पेशालिटी आणि स्पेशालिटी सेवा एकाच छताखाली कार्यरत आहेत, तब्बल २०० पेक्षा अधिक बेड्सचा आयसीयू बॅकअप,१७ अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर्स, सुसज्ज एमआरआय, एक्स-रे, पॅथॉलॉजी सुविधा तसेच २४ तास तज्ज्ञ इंटेन्सिव्हिस्ट सेवा येथे उपलब्ध आहेत. त्यामुळे सर्व प्रकारच्या आजारांवर एकाच ठिकाणी उपचार करणे शक्य झाले आहे.

——-

पेट स्कॅन व रेडीएशन थेरपी लवकरच सुरु होणार
लवकरच एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये पेट स्कॅन आणि रेडिएशन थेरपी सुविधा सुरू होणार असून, त्यामुळे कर्करोग निदान अधिक अचूक आणि उपचार अधिक प्रभावी ठरणार आहेत. आम्ही लवकरच पेट स्कॅन व रेडिएशन थेरपी सुरू करत आहोत, ज्यामुळे रुग्णाला उपचारांसाठी बाहेर कुठेही जावे लागणार नाही. एसएमबीटी हॉस्पिटल हे सर्वसमावेशक कर्करोग केअर सेंटर म्हणून काम करेल.

सचिन बोरसे, सीओओ, एसएमबीटी हॉस्पिटल

Comments are closed.