मोबाइल व्हॅनचे लोकार्पण : गावागावांत होणार मोफत नेत्र तपासणी
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
मोतीबिंदूसह विविध नेत्रविकार असणाऱ्या रुग्णांसाठी आनंदाची बातमी आहे. अशा रुग्णांची उपचारासाठी होणारी धावपळ आणि वणवण आता थांबणार आहे. मविप्र रुग्णालयाची ‘नेत्रवाहिनी’ आता थेट या रुग्णांच्या दारात पोहोचणार असून, गावागावांत मोफत नेत्रतपासणी केली जाणार आहे.
मराठा विद्या प्रसारक समाजाच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्राच्या वतीने दीपावलीच्या पार्श्वभूमीवर अद्ययावत अशा ‘मोबाइल ॲम्बुलन्स व्हॅन’ची (नेत्रवाहिनी) व्यवस्था करण्यात आली आहे. मविप्रचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी ( दि. १७) या नेत्रवाहिनीचे लोकार्पण करण्यात आले.
मविप्र रुग्णालयातील नेत्ररोग विभागाच्या वतीने जिल्ह्यात ठिकठिकाणी मोतीबिंदू तपासणी व मोफत नेत्र तपासणी करण्यात येते, याकरिता आता अद्ययावत व सुसज्ज अशी ‘फिरती नेत्रवाहिनी ॲम्बुलन्स व्हॅन’ मविप्र रुग्णालयाला उपलब्ध झाली आहे. तिचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने या वाहनाचे लोकार्पण करण्यात आले. या व्हॅनद्वारे जिल्हाभरातील गावागावांमध्ये नेत्रतज्ज्ञाद्वारे मोतीबिंदूसह मोफत नेत्रतपासणी केली जाणार आहे. नेत्रविकार होऊ नये, यासाठी काय काळजी घ्यावी, यावर मार्गदर्शनही केले जाणार आहे.
Comments are closed.