NGN News
Latest Marathi News

नियमोल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांवर वक्रदृष्टी; आधी नोटीसा, मग गुन्हे..

एक नोव्हेंबरपासून अंमलबजावणी; उपचारासंबंधी फलक लावण्यात बव्हंशी रुग्णालयांची कुचराई

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

रुग्ण सामान्य असो किंवा प्रतिष्ठीत, त्याच्या उपचाराचे बिल खिशाला परवडणारे नसते. कोणत्या उपचारासाठी किती रक्कम मोजायचे याचा ठोकताळा नसल्याने रुग्णाच्या उपचारांती बिल अदा करण्याशिवाय तरणोपाय नसतो. अनेकदा अव्वाच्या सव्वा बिल आल्याच्या तक्रारीही केल्या जातात. यावर उपाय म्हणून उपचार शुल्कासह अंदाजित खर्चाचे फलक लावण्याचे निर्देश असताना शहरात त्याचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र नर्सिंग होम कायद्यातील या तरतुदीला ठेंगा दाखवणाऱ्या रुग्णालयांविरोधात महापालिका मोहीम राबवणार आहे. त्यानुसार, येत्या एक नोव्हेंबरपासून नियमोल्लंघन करणारी रुग्णालये आरोग्य विभागाच्या रडारवर असणार आहेत.

नाशिक शहरात साडेसहाशेच्या घरात खासगी रुग्णालये आहेत. मात्र, उपचारासंबंधी फलक लावण्यात बव्हंशी रुग्णालये कुचराई करत असल्याचे निदर्शनास आले आहे. याक कारणाने रुग्णाच्या उपचारानंतर हातात पडणाऱ्या बिलांमुळे नातलगांचे डोळे पांढरे होण्याची वेळ येते आणि त्यामधून वाद उद्भवतात. यासंदर्भात महापालिकेच्या आरोग्य विभागाला तक्रारीही प्राप्त झाल्या आहेत. त्याच अनुषंगाने महापालिका प्रशासन मोहीम राबवणार आहे.

या स्वरूपाच्या तक्रारी …

  • रुग्ण दाखल करून घेताना अनामत रकमेची मागणी
  • उपचारादी शुल्काचे फलक न लावणे
  • अव्वाच्या सव्वा बिलांची आकारणी करणे
  • रुग्ण दगावल्यास नातेवाईकांना आवश्यक सहकार्य न करणे

महापालिका आरोग्य विभाग म्हणतो..

” रुग्णालय चालवणे हा केवळ व्यवसाय नसून टी एक सामाजिक जबाबदारी आहे. खासगी रुग्णालयात कायद्याप्रमाणे रुग्सेणवा दिली जाते की नाही, यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी आमची ( आरोग्य विभागाची ) आहे. प्रत्येक ठिकाणी ठळक पद्धतीने उपचार, रूम यांसह शस्त्रक्रियांचे ( अंदाजित ) दरपत्रक लावणे अनिवार्य आहे. महाराष्ट्र नर्सिंग होम कायद्यानुसार नियमांचे उल्लंघनकरणऱ्या रुग्णालयांना आधी लेखी स्वरुपात नोटीस दिली जाईल. त्यानंतरही सुधारणा न झाल्यास गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नागरिकांना योग्य सेवा न देणाऱ्या रुग्णालये अथवा दवाखान्यांविरोधात तक्रार करावयाची असल्यास १८००२३४२२४९ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करता येईल.”

आयएमची भूमिका ….

नाशिक महापालिकेतर्फे येत्या एक नोव्हेंबरपासून राबवण्यात येणाऱ्या मोहिमेबाबत आम्ही अवगत आहोत. महाराष्ट्र नर्सिंग होम कायद्यातील तरतुदीनुसार नियमांचे पालन करणे प्रत्येक रुग्णालय चालक डॉक्टरांचे कर्तव्य आहे. असलेल्या त्रुटीची पूर्तता करण्यासाठी आम्हीच आग्रही असतो. हॉस्पिटल्स ओनर्स संघटनेच्या बैठकीतही हा मुद्दा चर्चिला गेला आहे. शिवाय आमच्या व्हाटसअप ग्रुपवर देखील महापालिकेच्या प्रस्तावित मोहिमेची माहिती देण्यात आली आहे. सर्वांनी नियमांचे पालन करावे, याची जाणीव त्याद्वारे करून देण्यात आली आहे.

डॉ. मंगेश थेटे, उपाध्यक्ष, आयएम, महाराष्ट्र राज्य

Comments are closed.