नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
मानवतेचा आणि वैद्यकीय कौशल्याचा उत्कृष्ट संगम अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये अनुभवायला मिळाला. यशस्वी लिव्हर प्रत्यारोपणामुळे ३७ वर्षीय रुग्णाला नवजीवन प्राप्त झाले. या शस्त्रक्रियेचे नेतृत्व वरिष्ठ लिव्हर प्रत्यारोपण शल्यविशारद डॉ. शरण नरुटे यांनी केले.
रुग्णाची तब्येत गेल्या काही महिन्यांपासून खालावत होती. यकृत निकामी होणे, वारंवार रुग्णालयात दाखल होणे, हिपॅटिक एन्सेफालोपॅथी, सेप्सिस आणि संसर्ग अशा गुंतागुंतींमुळे त्यांचे आयुष्य धोक्यात आले होते. एका गंभीर संसर्गामुळे त्यांचा एक डोळाही गमवावा लागला होता. त्यामुळे प्रत्यारोपण हाच शेवटचा उपाय उरला होता. ते अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल येथील मेडिकल गॅस्ट्रोएन्टेरॉलॉजी टीम डॉ. संदीप पाटील, डॉ. अमोल शिंदे आणि डॉ. मनोज भंबारे यांच्या देखरेखीखाली उपचार घेत होते. रुग्णाची पत्नी स्वतःचे लिव्हर दान करण्यास तयार झाली होती, मात्र तिचा रक्तगट न जुळल्याने तिचे दान शक्य झाले नाही.
दरम्यान, पुण्यातील इनामदार हॉस्पिटलमध्ये एका तरुणाचा मेंदूमृत्यू झाला. त्या दात्याच्या कुटुंबियांनी उदार मनाने लिव्हर, मूत्रपिंड, हृदय व फुफ्फुस असे अनेक अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. या दानामुळे अनेकांना नवजीवन मिळाले. त्यातील यकृत तातडीने ग्रीन कॉरिडॉरच्या माध्यमातून पुणे ते नाशिक अवघ्या साडेतीन तासांत पोहोचविण्यात आले. या कार्यात महाराष्ट्र पोलिस वाहतूक विभागाकडून पोलीस निरीक्षक सुभाष पवार (नाशिकरोड) आणि पोलीस निरीक्षक विश्वास पाटील (मुंबई नाका) तसेच दोन्ही हॉस्पिटलमधील समन्वयकांनी मोलाची भूमिका बजावली.
ही शस्त्रक्रिया मेडिकव्हर हॉस्पिटल चे वरिष्ठ लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. शरण नरुटे यांनी यशस्वीरित्या पार पाडली. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाचा बरा होण्याचा प्रवास अत्यंत उल्लेखनीय ठरला. काही तासांतच त्यांना व्हेंटिलेटरवरून मुक्त करण्यात आले. पहिल्याच दिवशी त्यांनी द्रवपदार्थांचे सेवन केले, तर दुसऱ्याच दिवशी ते स्वतः चालू लागले. आज ते नियमित आहार घेत असून आपली दैनंदिन कामे स्वतंत्रपणे करू लागले आहेत.
या यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल बोलताना डॉ. शरण नरुटे म्हणाले : “हे केवळ वैद्यकीय यशाचे उदाहरण नाही, तर मानवतेचे सर्वोत्तम रूप आहे. एका तरुण दात्याच्या अमूल्य देणगीमुळे एका रुग्णाला नवजीवन मिळाले. पोलिस विभाग, दोन्ही हॉस्पिटल्सचा समन्वय आणि आमच्या संपूर्ण वैद्यकीय टीमच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले. अशा घटना अवयवदानाचे महत्व अधोरेखित करतात.”
याप्रसंगी श्री. अनुप त्रिपाठी (केंद्र प्रमुख) यांनी दात्याच्या कुटुंबियांचे आणि संपूर्ण मेडिकल टीम तसेच पोलीस विभाग यांचे मनःपूर्वक आभार मानले असून अवयव प्रत्यारोपण क्षेत्रातील उत्कृष्ट सेवा आणि जीवदान देण्याच्या कार्यासाठी आपली वचनबद्धता पुन्हा दृढ केली आहे.
Comments are closed.