NGN News
Latest Marathi News

युद्धाच्या उंबरठ्यावरील जगाला योगाची गरज : प्रसाद कुलकर्णी

गीत पटणी लिखित ‘योगमय मन आरोग्य’ पुस्तकाचे प्रकाशन

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

जगात युद्धजन्य परिस्थिती किती भयंकर झाली, हे थायलंड आणि कंबोडिया या निरुपद्रवी देशांमध्ये एका मंदिरावरून झालेल्या युद्धावरून दिसून येते. युद्धाच्या उंबरठ्यावर उभ्या ठाकलेल्या जगाला योगाची अत्यंत गरज आहे, असे प्रतिपादन कवी तथा लेखक प्रसाद कुलकर्णी यांनी केले. यावेळी त्यांनी लेखिका गीत पटणी हिचे कौतुक करताना, नाशिकची कन्या योगामुळे जगाच्या नकाशावर आपले नाव रोशन करणार असल्याचेही ते म्हणाले.

गुरुदक्षिणा सभागृहात आयोजित डॉ. गीत पराग पटणी लिखित ‘योगमय मन आरोग्य’ या पुस्तकाच्या मराठी आणि इंग्रजी आवृतीच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर बालरोग तज्ज्ञ डॉ. शर्मिला कुलकर्णी, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन बोधले, डॉ. सुबोध पटणी, डॉ. पराग पटणी, डॉ. काजल पटणी, डॉ. गीत पटणी आदी उपस्थित होते.

प्रसाद कुलकर्णी म्हणाले, मोबाइलचा शोध लागला, तेव्हा माणसे जवळ येतील असे वाटत होते. मात्र, मोबाइलने माणसे तोडली आहेत. मोबाइलने व्हॉट्स ॲप आणि फेसबुक ही दोन विद्यापीठे निर्माण केली आहेत. या विद्यापीठात कोणीच विद्यार्थी नाहीत, तर सर्वच कुलगुरू आहेत. आले की कर फॉरवर्ड एवढाच प्रकार याठिकाणी चालतो. मोबाइलने माणसाला गुलाम बनविले आहे. माणसामाणसांमध्ये मतभेद निर्माण केले आहेत. या सर्व प्रकारावर ‘योग’ हा उपाय असल्याचे ते म्हणाले. तसेच लेखिका गीत हिचे कौतुक करताना त्यांनी, ज्या वयात खेळणी घेवून खेळायचे असते, त्या वयात पुस्तक लिहिणे खरोखरच कौतुकास्पद असल्याचेही ते म्हणाले. डॉ. शर्मिला कुलकर्णी म्हणाल्या, योग किंवा प्राणायाम केल्याने केवळ शारिरीकच फायदे होत नाहीत, तर मानसिक, सामाजिक अशा सर्वच पातळ्यांवर फायदे आहेत. शिवाय योगाने एकाग्रता वाढते. आपल्या अवतीभोवती असलेल्या गॅझेटमुळे तणाव वाढत आहे. मात्र, योगाने ताण कमी होवून मुलांमध्ये एनर्जी वाढते. त्यामुळे योगाचे फायदे लक्षात घेवून सर्वांनी त्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

कार्यक्रमास माजी नगरसेविका डॉ. हेमलता पाटील, नरेंद्र ठक्कर, विक्रम कापडिया, ॲड. सुबोध शहा, डॉ. फारूख मोतीवाला, शिवदास डागा, संजय होळकर, चंदुलाल शहा, डॉ. श्रीनिवास दायमा, ज्ञानेश्वर जगताप, सुवर्णा जगताप आदी उपस्थित होते.  

Comments are closed.