ठाणे : एनजीएन न्यूज नेटवर्क
सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन झाळे आहे. वयाच्या ३८ व्या वर्षी प्रियाने अखेरचा श्वास घेतला. मागील बऱ्याच काळापासून प्रिया मराठे कर्करोगाशी झुंज देत होती. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेच्या माध्यमातून प्रिया ही देशभरामध्ये हिंदी भाषिकांच्या घरोघरी ओळखीचा चेहरा झाली होती. अनेक मालिकांमध्ये प्रभावशाली कामगिरी करणाऱ्या प्रियाचं एवढ्या लहान वयात निधन झाल्याबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.
रविवारी पहाटे चार वाजता प्रियाचे मीरा रोड येथे निधन झाळे. प्रियाच्या पार्थिवावर सायंकाळी चार वाजता अंतिम संस्कार केले जाणार आहेत. प्रिया मराठे गेल्या वर्षभरापासून कर्करोगाशी झुंज देत होत्या आणि या आजारामुळे त्या लाइमलाइटपासून दूर होत्या. प्रिया मराठेचा जन्म २३ एप्रिल १९८७ रोजी ठाण्यात झाला. २००६ साली ‘या सुखांनो या’ या मराठी मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. त्यानंतर विविध मराठी आणि हिंदी मालिकांमधून ती वेळोवेळी प्रेक्षकांच्या भेटीस आली. प्रिया मराठेने श्रीकांत मोघे यांचा मुलगा शंतनू मोघेसोबत २०१२ मध्ये लग्न केले होते. शंतनू स्वतः एक अभिनेता आहे. प्रियाच्या मागे पती आणि आई असा परिवार आहे.
मालिकांमधून अभिनयाची छाप ..
‘कसम से’, ‘पवित्र रिश्ता’, ‘बडे अच्छे लगते है’, ‘चार दिवस सासूचे’, ‘तू तिथे मी’, ‘कॉमेडी सर्कस’ इत्यादी मालिकांमध्ये प्रियाने आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्याच प्रियाने मराठी चित्रपटसृष्टीमध्येही काम केलं.2016 साली प्रदर्शित झालेल्या ‘विघ्नहर्ता महागणपती’ चित्रपटात प्रिया झळकली होती. तसेच याच वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘किरण कुलकर्णी व्हर्सेस किरण कुलकर्णी’ चित्रपटातही तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती.
Comments are closed.