१८५ प्रस्ताव प्राप्त; निवड समितीकडून पुस्तक परीक्षणाचे काम
नाशिक: एनजीएन नेटवर्क
‘साहित्यकणा फाउंडेशन’च्या वतीने देण्यात येणारे मानाचे वाड्मयीन पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. फाउंडेशनचे अध्यक्ष संजय द. गोराडे यांनी या पुरस्कारांची अधिकृत घोषणा केली. यावर्षी साहित्यकणा वाड्मयीन पुरस्कारासाठी एकूण १८५ प्रस्ताव प्राप्त झाले होते. या पुरस्कारांसाठी राकेश वानखेडे, राजेंद्र सोमवंशी, प्रा. गंगा गवळी आणि प्रा. प्रीती गायकवाड या परीक्षक निवड समितीने पुस्तक परीक्षणाचे काम पाहिले.
यावर्षीचा ‘सुमनताई पंचभाई स्मृती कवितासंग्रह पुरस्कार’ डॉ. पल्लवी परुळेकर-बनसोडे यांच्या ‘नभपर्णिका’ संग्रहास, तर ‘मीराबाई गोराडे स्मृती कथासंग्रह पुरस्कार’ सयाजी शिंदे यांच्या ‘चरैवेति’ या पुस्तकास जाहीर झाला आहे. कादंबरी विभागात सचिन फक्कड अवघडे यांच्या ‘फक्कड’ या कलाकृतीला ‘शिलाताई राजपूत गहिलोत स्मृती पुरस्कार’ मिळाला आहे. बालसाहित्यासाठी जितेंद्र कुवर यांच्या ‘झिलप्या’ बालकथासंग्रहास, तर गझल क्षेत्रातील योगदानासाठी सतीश गुलाबसिंह मालवे यांच्या ‘एक पक्षी’ या गझलसंग्रहास स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
हे पुरस्कार १ फेब्रुवारी रोजी नाशिक येथील समर्थ मंगल कार्यालय (कॅनडा कॉर्नर) येथे आयोजित ‘साहित्यकणा संमेलनात’ वितरित केले जातील. या संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिक सुरेश पाचकवडे भूषविणार असून, उद्घाटन पृथ्वीराज तौर यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याला रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सचिव विलास पंचभाई यांनी केले आहे.
Comments are closed.