NGN News
Latest Marathi News

शिवभक्तीशिवाय मनुष्य जीवनाचा उद्धार नाही : स्वामी शांतिगिरीजी महाराज

पायी कावड यात्रेने येत हजारो भाविकांनी केला बाणेश्वर महादेवास जलाभिषेक..

ओझर : अमर आढाव

पत्रम्-फलम्-पुष्पम्-तोयम् या अल्पशा पूजेने देखील भगवान शिव प्रसन्न होतात. अशा भगवान शिवाची भक्ती करणे हाच खरा धर्म आहे.अत्यंत दयाळू आणि भक्तवत्सल भगवान शिव आहेत.मनुष्य जीवन सार्थकी करायचे असेल तर शिवभक्ती करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन निष्काम कर्मयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी महाराज धर्म पिठाचे पिठाधीश्वर अनंत विभूषित जगदगुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांनी केले.

ओझर येथील देवभूमी जनशांती धाम येथे चौथ्या श्रावणी सोमवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत कावड यात्रा व महाजलाभिषेक सोहळा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.”हर हर महादेव, “जय बाबाजी” अशा प्रचंड जय घोषांनी जनशंती धाम परिसर दुमदुमून गेला होता.ओंकारेश्वर,रामकुंड,सप्तशृंगी गड यांसह विविध तीर्थक्षेत्राहून पायी कावड यात्रेने येत भाविकांनी भगवान बाणेश्वर महादेवास जलाभिषेक केला. जगदगुरु स्वामी शांतीगिरीजी महाराजांच्या उपस्थितीत रविवारी रात्री १२ वाजता भगवान बाणेश्वर महादेवाचा प्रथम जलाभिषेक संपन्न झाला.सोमवारी पहाटे ४ वाजता पुन्हा आश्रमीय संत व जनशांती धाम कार्यकारी मंडळ यांच्या हस्ते अभिषेक पूजन संपन्न झाले.दुपार सत्रात म्हाळसा माता महिला भक्त मंडळ व सायंकाळी सल्लागार समिती व नियोजन समिती सदस्य यांच्या हस्ते जलाभिषेक संपन्न झाला.यावेळी कावड घेऊन आलेल्या हजारो भाविकांनी भगवान बाणेश्वर महादेवास जलाभिषेक केला.

जगदगुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांनी उपस्थित हजारो भाविकांना मार्गदर्शन केले.कात्यायनी ऋषींनी शंभर वर्ष तपस्या केली.व त्यांना सारस्वत ऋषींनी उपदेश करतांना सांगितले की धर्माचे नाव नंदी आहे. त्यावर विराजमान असलेल्या भगवान शिवाची भक्ती करणे हाच खरा धर्म आहे. त्यामुळे प्रत्येकाने शिवभक्ती करावी. ज्याने शिवभक्ती नाही केली, त्याची माय व्यर्थ श्रमली.इतके महत्व शिवभक्तीला आहे. दुर्लभ असलेला मनुष्य देह आपल्याला मिळाला आहे.हे आपले सर्वात मोठे भाग्य आहे.भक्तीचा आनंद केवळ मनुष्य देहातच मिळू शकतो.’ शिव-शिव अक्षरे दोन,जो वदे रात्रंदिन धन्य तयाचा संसार’ या प्रमाणे भगवान शिवाचे निरंतर नामस्मरण करा. महादेवाच्या मंदिरात दिवा लावण्याचे व बिल्वपत्र वाहण्याचे मोठे महत्त्व आहे.असेही जगदगुरु स्वामी शांतीगिरिजी महाराज यांनी यावेळी सांगितले.चौथ्या श्रावणी सोमवार सोहळ्याचा प्रारंभ अभिषेक पूजनाने झाला. यानंतर नित्य नियम विधी,आरती,सत्संग संपन्न झाला.जगदगुरु बाबाजींची पवित्र पालखी व श्री बाणेश्वर महादेव मुकुट मिरवणूक मोठ्या उत्साहात संपन्न झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आश्रमीय कार्याची माहिती विवेकानंद महाराज यांनी दिली.यावेळी हजारो भाविकांनी जलाभिषेक,शिवदर्शन व प्रसादाचा लाभ घेतला.

Comments are closed.