NGN News
Latest Marathi News

सरासरी कांदा दर ३९०० रुपये क्विंटल; ६ दिवसांत १४ टक्क्यांची घसरण

** एनजीएन न्यूज नेटवर्क

लासलगाव : राकेश बोरा

खरीप कांद्याची नवीन आवक सुरू झाल्याने देशातील कांद्याच्या उपलब्धतेत मोठी सुधारणा झाली असून, महाराष्ट्रातील कांद्याच्या सरासरी बाजारभावात अवघ्या ६ दिवसांत सुमारे १४ टक्क्यांची घसरण झाली आहे. १ ऑक्टोबर रोजी ४ हजार ४५१ रुपये प्रतिक्विंटल असलेला सरासरी दर ६ ऑक्टोबर रोजी ३ हजार ९०० रुपयांवर आला. आगामी आठवड्यांत खरीप कांद्याची आवक आणखी वाढण्याची शक्यता असल्याने दर आणखी घसरण्याची शक्यता केंद्र सरकारने दिले आहेत.

केंद्रीय उपभोक्ता कार्य, खाद्य व सार्वजनिक वितरण मंत्रालयाने बुधवारी (दि. ७) जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात कांद्याची देशात किफायतशीर दरात पुरेशी उपलब्धता असल्याचे म्हटले आहे. खरीप कांद्याचे वाढलेले क्षेत्र, अनुकूल हवामान, बाजारातील वाढती आवक आणि नवीन पिकाची सुरू झालेली आवक यामुळे कांद्याच्या पुरवठ्यात सुधारणा झाल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि राजस्थान या प्रमुख उत्पादक राज्यांतून खरीप कांद्याची नवीन आवक सुरू झाली आहे. आगामी आठवड्यांत या भागांतून आवक वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, देशभरातील खरीप कांद्याचे लागवड क्षेत्र मागील वर्षाच्या उच्च पातळीपेक्षा सुमारे पाच टक्क्यांनी अधिक राहण्याचा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार प्रमुख खरीप कांदा उत्पादक भागांत काढणीच्या काळात अतिवृष्टीची शक्यता कमी असल्याने काढणी, वाळवणी आणि वाहतुकीस अनुकूल परिस्थिती राहण्याची अपेक्षा आहे.

स्वस्त कांदा’चा फायदा ग्राहकांना; मग शेतकऱ्यांचे काय?

मागील दोन आठवड्यांत १२६ शहरांमध्ये किरकोळ कांद्याच्या दरात किलोमागे २० रुपयांपर्यंत घट झाल्याचे केंद्राने सांगितले आहे. ग्राहकांसाठी ही दिलासादायक बाब असली, तरी किरकोळ दरातील घसरणीचा फायदा ग्राहकांना मिळताना उत्पादकाला मिळणाऱ्या बाजारभावातही सातत्याने घट होत असेल, तर त्याचा आर्थिक भार कोण उचलणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

१२३ शहरांत बफर कांद्याचा पुरवठा

केंद्र सरकारने कांद्याचा बफर स्टॉक टप्प्याटप्प्याने आणि नियोजनबद्ध पद्धतीने बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत १२३ शहरांमध्ये आठ ‘कांदा एक्स्प्रेस’ आणि ४६७ ट्रकच्या माध्यमातून दोन लाख क्विंटलपेक्षा अधिक कांद्याचा पुरवठा करण्यात आला आहे. ज्या बाजारपेठांमध्ये कांद्याची मागणी अधिक आहे, तेथे आणखी बफर कांदा पोहोचविण्यासाठी अतिरिक्त रेल्वे रॅक चालविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

खरीप कांद्याची नवीन आवक, साठवणूक केलेला कांदा आणि बफर स्टॉकमधून ग्राहक केंद्रांपर्यंत होत असलेला पुरवठा या तिन्ही माध्यमांतून बाजारात कांद्याची उपलब्धता वाढत आहे. सरकारकडून आवक, साठा आणि बाजारभावावर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून, आवश्यकतेनुसार कांद्याचे वितरण वाढविण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

दरम्यान, आगामी सणासुदीच्या काळात खरीप कांद्याची आवक वाढण्याची शक्यता असल्याने ग्राहकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा सरकारने व्यक्त केली आहे. मात्र, बाजारभावातील घसरणीचा थेट परिणाम कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होणार असल्याने ग्राहकांना स्वस्त कांदा देताना उत्पादकांना योग्य भाव मिळणार कसा, हा प्रश्नही महत्त्वाचा ठरणार आहे.

——–

@ तीन एकरामध्ये कांद्याचे उत्पादन घेतले होते कांदा काढण्याच्या वेळेस मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले तर सुरुवातीला मे आणि जून महिन्यामध्ये एक हजार रुपये प्रति क्विंटल च्या जवळपास विक्री केला होता पुढील ठिकाणी कुटुंबाच्या उदारनिर्वाच्या गरजेनुसार विक्री करण्यासाठी साठवला होता त्यातील कांदा गेल्या आठवड्यात लासलगाव बाजार समितीत ४२०० प्रतिक्विंटल ने विक्री केला होता आता त्याच  कांद्याला ३४०० प्रति क्विंटल दर मिळाल्याने मोठे नुकसान झाले आहे 

अशोक जाधव, कांदा उत्पादक शेतकरी – सांगवी भुसार ता. कोपरगाव 

Comments are closed.