NGN News
Latest Marathi News

कुंदा बच्छाव राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित  

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : महापालिका शाळेच्या माध्यमातून शिक्षणात विविध प्रयोग करणाऱ्या उपक्रमशील शिक्षिका कुंदा बच्छाव यांना आज राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिक्षक दिनानिमित्त दिल्ली येथील विज्ञान भवनात आयोजित सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते बच्छाव यांनी पुरस्कार स्वीकारला. महाराष्ट्रातील एकूण चार शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.

 कुंदा बच्छाव या नाशिक महानगरपालिकेच्या आनंदवली शाळा क्रमांक १८ येथे उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. २००५ पासून त्या विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करतात. मात्र, फक्त विद्यार्थ्यांना पुस्तकी शिक्षण नाही तर संपूर्ण गावच विद्यार्थ्यांसाठी शिकण्याचे माध्यम बनावे, या विचारातून त्यांनी आनंदवली येथे ज्ञानभिंती उपक्रम राबवला. लोकसहभागातून गावातील अनेक घरांच्या भिंतीवर नकाशे, गणिताची सूत्रे, इंग्रजी शब्द आणि क्लुप्त्या आणि रंगवण्यात आल्या आहेत. मोबाईल गेममध्ये वेळ घालवण्याऐवजी मुले या भिंती वाचू लागले. त्यावरील कोडी सोडू लागले. आई-वडिलांसोबत उभे राहून शिक्षणाचा आनंद घेऊ लागले. शिक्षण घराबाहेर आणि गावाच्या भिंतीवर आले, ही उपक्रमाची मोठी ताकद ठरली. त्यानंतर सामाजिक सहभागातून शाळेला डिजिटल साहित्य मिळून देत शाळा स्मार्ट आणि मॉडेल स्कूल बनवण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला. मुलांच्या सुरक्षिततेसाठी स्मार्ट अटेंडन्स, संविधान सापशिडी, मूल्यमापन शिडी, लोकसभागातून विद्यार्थ्यांची इस्रोला भेट असे अनेक उपक्रम त्यांनी यशस्वीपणे राबवले.

दरम्यान, या पुरस्कार प्राप्तीबद्दल कुंदा बच्छाव यांचे समाजातील विविध घटकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

Comments are closed.