NGN News
Latest Marathi News

‘सप्तशृंगगडावरच बसस्थानक द्या’ : आ. पवारांच्या पुढाकाराने पालकमंत्र्यांकडे ग्रामस्थांचा एल्गार

  • कोड्याची विहीर येथे बसस्थानकाचा प्रस्ताव म्हणजे गावाच्या रोजगारावर घाला; भाविकांनाही तब्बल एक किलोमीटर पायी चालण्याची वेळ येणार असल्याचा ग्रामस्थांचा दावा

** एनजीएन न्यूज नेटवर्क

सप्तशृंगगड | रघुवीर जोशी

महाराष्ट्रातील आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावरील कायमस्वरूपी एस.टी. बसस्थानकाच्या प्रश्नाने आता निर्णायक वळण घेतले आहे. कोड्याची विहीर परिसरात बसस्थानक उभारण्याच्या नियोजनाला स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवत, गडावरील गावात किंवा शिवालय तलाव परिसरातच कायमस्वरूपी बसस्थानक उभारण्याची ठाम मागणी केली आहे. या मागणीसाठी आमदार नितीन पवार यांच्या पुढाकाराने ग्रामस्थांनी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली व निवेदन सादर केले.

बैठकीत आमदार नितीन पवार यांनी फ्युनिक्युलर रोपवे प्रकल्प सुरू झाल्यानंतर गडावरील मुख्य बाजारपेठेतील भाविकांची वर्दळ लक्षणीय घटल्याची बाब पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे पूजा साहित्य विक्रेते, लघु व्यावसायिक, दुकानदार आणि स्थानिकांच्या रोजगारावर मोठा परिणाम झाला असून अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर संकट निर्माण झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ग्रामस्थांनी बैठकीत स्पष्ट भूमिका मांडताना सांगितले की, जर बसस्थानक कोड्याची विहीर परिसरात उभारण्यात आले, तर भाविकांना सुमारे एक किलोमीटर पायी चालत गडावरील मंदिर आणि गाव गाठावे लागेल. यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच लहान मुलांसह येणाऱ्या भाविकांची मोठी गैरसोय होईल. त्याचबरोबर गावातील बाजारपेठेकडे भाविकांचा ओघ आणखी कमी होऊन स्थानिक व्यापार आणि रोजगारावर गंभीर परिणाम होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली.

या प्रश्नासाठी ग्रामस्थांनी एकजूट दाखवत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच, स्थानिक नागरिकांनी, पत्रकार, व्यापारी वर्ग, युवा आदी एकत्र येऊन सातत्याने पाठपुरावा केला. विविध समाजमाध्यमांद्वारे हा प्रश्न राज्याच्या निदर्शनास आणण्यात आला. त्यानंतर प्रथम आमदार नितीन पवार यांच्याकडे दाद मागण्यात आली. आमदारांनी तातडीने या विषयाची दखल घेत ग्रामस्थांसह पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घडवून आणली.

पालकमंत्र्यांसमोर ग्रामस्थांनी सद्यस्थिती, गावावर निर्माण झालेल्या अडचणी, बसस्थानकाच्या प्रस्तावामुळे स्थानिक व्यापार आणि रोजगारावर होणारे संभाव्य परिणाम यांचे सविस्तर सादरीकरण केले. यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गडाचा नकाशा पाहून ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा केली आणि सर्व बाजू समजून घेत सकारात्मक भूमिका दर्शविली.

गावातील अंतर्गत परिसरात किंवा शिवालय तलाव परिसरातील वनविश्रामगृहासमोर कायमस्वरूपी एस.टी. बसस्थानक उभारण्यात आल्यास बसेस थेट गावात पोहोचतील, भाविकांची ये-जा वाढेल, स्थानिक व्यापाराला चालना मिळेल आणि गडावरील अर्थचक्राला पुन्हा गती मिळेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.

यावेळी आमदार नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली सरपंच रमेश पवार, उपसरपंच संदीप बेनके, सदस्य राजेश गवळी, व्यापारी वर्ग अजय दुबे, तुषार बर्डे, निलेश कदम, प्रकाश कडवे, भूषण देशमुख, उद्धव कदम, शुभम गांगुर्डे, योगेश कदम, दिलीप बर्डे, प्रवीण पवार, योगेश गव्हाणे यांच्यासह ग्रामपंचायत माजी सरपंच, व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीअंती पालकमंत्री गिरीश महाजन यांनी या मागणीची दखल घेत तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून योग्य निर्णयासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. ग्रामस्थांच्या मते हा प्रश्न केवळ एस.टी. बसस्थानकाचा नसून सप्तशृंगगडावरील हजारो स्थानिकांच्या रोजगार, व्यापार, भाविकांच्या सुविधांशी आणि गावाच्या भवितव्याशी निगडित असल्याने शासनाने यावर तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.

प्रतिक्रिया _

“सप्तशृंगगड हे राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे कायमस्वरूपी एस.टी. बसस्थानक हे गडावरील गावातच उभारले गेले पाहिजे. बसस्थानक गावात असल्यास भाविकांना थेट गावात येण्याची सुविधा मिळेल, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांगांची गैरसोय टळेल, तसेच स्थानिक रोजगारालाही आधार मिळेल. प्रशासनाने स्थानिकांची भावना आणि प्रत्यक्ष परिस्थिती लक्षात घेऊन गावातील योग्य जागेची निवड करावी, ही आमची ठाम भूमिका आहे.”
सरपंच रमेश पवार, सप्तशृंगगड.

“गेल्या काही वर्षांत गडावरील भाविकांची गावातील वर्दळ दिवसेंदिवस कमी होत आहे. रोपवे सुरू झाल्यानंतर त्याचा परिणाम अधिक जाणवू लागला आहे. अशा परिस्थितीत बसस्थानकही गावाबाहेर गेले तर परिस्थिती आणखी गंभीर होईल. गावात भाविक आले तरच गाव जिवंत राहील. त्यामुळे शासनाने हा विषय केवळ वाहतुकीचा न समजता गावाच्या अस्तित्वाशी जोडलेला प्रश्न म्हणून पाहावा.”
उपसरपंच संदीप बेनके, सप्तशृंगगड.

“पूर्वी भाविक गावातील बाजारपेठेत येत असल्याने प्रत्येक व्यापाऱ्याचा व्यवसाय चालायचा. मात्र आता भाविकांची वर्दळ कमी झाल्यामुळे अनेक दुकानांवर उपासमारीची वेळ आली आहे. व्यापार मोठ्या प्रमाणात घटला असून अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह धोक्यात आला आहे. जर बसस्थानकही गावापासून दूर गेले, तर उरलेसुरले ग्राहकही कमी होतील. त्यामुळे गावातच बसस्थानक उभारणे हा स्थानिक व्यापाऱ्यांसाठी नव्हे तर संपूर्ण गावाच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय ठरेल.”
व्यापारी प्रतिनिधी अजय दुबे, तुषार बर्डे, निलेश कदम, शुभम गांगुर्डे.

Comments are closed.