** एनजीएन न्यूज नेटवर्क
आपेगाव : संत ज्ञानेश्वर महाराज जन्मसंस्थान, श्रीक्षेत्र आपेगाव यांच्या वतीने मंगळवार, दि. २४ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेले ‘संत ज्ञानोबाराय तृतीय साहित्य संमेलन २०२६’ अत्यंत उत्साहपूर्ण, आनंददायी आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाले. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पावन जन्मभूमीत आयोजित या साहित्य सोहळ्याला महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेले साहित्यिक, कवी, लेखक, गझलकार, कलावंत आणि साहित्यप्रेमी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. साहित्य, गझल, हास्यकविता, मुलाखत, काव्यसंमेलन, पुरस्कार वितरण, पुस्तक प्रकाशन, वारकरी संगीत आणि दीपोत्सव अशा विविधांगी कार्यक्रमांनी संमेलन संस्मरणीय ठरले.
या संमेलनाचे उद्घाटन लोककवी प्रशांतदादा मोरे, हास्यकवी नितीन वरणकार, माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड आणि आध्यात्म विवेकी ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. उपस्थिती प्रमुख पाहुणे लोककवी प्रशांत मोरे, हास्यकवी नितीन वरणकार, माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड, अनघा सोमवंशी, हनुमंत चांदगुडे, नितीन वायाळ, दुर्गासिंग जाधव, ज्ञानेश्वर शिळवणे, संजय गोराडे, प्रकाश चव्हाण आणि रवींद्र मगर या मान्यवरांना संत ज्ञानेश्वर महाराज जन्मसंस्थानच्या वतीने सन्मानमुद्रा प्रदान करून गौरविण्यात आले. संत ज्ञानोबाराय साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी सातत्याने झटणाऱ्या आणि प्रसंगी स्वतःच्या जबाबदाऱ्या बाजूला ठेवून संमेलनाच्या प्रत्येक कामात हिरिरीने सहभागी होणारे आणि संमेलनाच्या यशस्वी वाटचालीत मोलाचे योगदान देणारे संजय कावरे, अरविंद शेलार, गणेश सांगुनवेढे, जे. डी. भुसारे, हरिदास कोष्टी, डॉ. राम शिंदे, पेंटर देशमुख, राम गायकवाड, स्नेहल येवला, वंदना जायले, पूजा बागूल, सुदर्शन टोपरे, विलास पंचभाई, संतोष साळुंके आणि मारुती तायनाथ यांचा सन्मान करून त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
संमेलनाच्या कार्यक्रमांची सुरुवात गझल मुशायऱ्याने झाली. बाळासाहेब गिरी, गोरख पालवे, प्रशांत वाघ, निलेश कवडे, नितीन वायाळ (शिवानुज), हनुमंत चांदगुडे, राम गायकवाड, पंडित वराडे आणि सरिता कलढोणे या गझलकारांनी आपल्या आशयघन, भावस्पर्शी आणि दर्जेदार गझल सादर करून रसिकांची मने जिंकली. प्रेम, जीवनानुभव, सामाजिक वास्तव आणि मानवी भावभावनांचे विविध पैलू त्यांच्या गझलांमधून उलगडले. या बहारदार मुशायऱ्याचे सूत्रसंचालन गिरीश जोशी यांनी अभ्यासपूर्ण आणि प्रभावी शैलीत केले. त्यानंतर ‘हासू आणि आसू’ हा हास्यकवितांचा विशेष कार्यक्रम पार पडला. लोककवी विजय पोहनेरकर आणि रवींद्र मगर यांनी आपल्या विनोदी, खुमासदार आणि प्रसंगानुरूप कवितांच्या सादरीकरणातून उपस्थितांना मनमुराद हसवले. हास्याच्या फवाऱ्यांसोबतच जीवनातील भावनिक पैलूंची जाणीव करून देणाऱ्या या कार्यक्रमाला साहित्यिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. लोककवी प्रशांत मोरे यांची विशेष मुलाखत प्रसिद्ध कवी संजय कावरे यांनी घेतली. प्रशांत मोरे यांचा साहित्यिक प्रवास, कविता निर्मितीची प्रक्रिया, सामाजिक जाणीव, काव्यलेखनामागील भूमिका आणि विविध अनुभव यांवर या मुलाखतीत मनमोकळा संवाद घडला. प्रशांत मोरे यांनी अनेक भावपूर्ण कविता सादर करून अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या केल्या.
आयोजित कवी संमेलनात संजय आहेर, शुभांगी पाटील, अमोल चिने, लक्ष्मण शिंदे, विष्णू वाघ, आयुब खान, सुरेखा काळुसे, संजना मगर, जयश्री थोरवे, यांच्यासह अनेक कवींनी आपल्या दर्जेदार कविता सादर केल्या. संमेलनाच्या आयोजक आणि सुप्रसिद्ध कवयित्री अश्विनी (जिजी) वाकणकर यांनी लिहिलेल्या ‘श्री संतकृपामृत उखाणे’ या भक्तिमय उखाण्यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या संमेलनातील आणखी एक विशेष आनंदाचा क्षण म्हणजे लेखक संदीप राक्षे यांच्या ‘हंपी’ या प्रवासवर्णनपर सातव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा. उपस्थितीत प्रमुख पाहुणे आणि पन्नास ज्ञानरत्न पुरस्कारार्थी यांच्या शुभहस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराज जन्मसंस्थानच्या वतीने साहित्य, कला आणि संस्कृती क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पन्नास साहित्यिकांची ‘ज्ञानरत्न पुरस्कार २०२६’ साठी निवड करण्यात आली होती. मान्यवरांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करून साहित्यिकांच्या योगदानाचा यथोचित गौरव करण्यात आला.
या पुरस्काराचे मानकरी पुढीलप्रमाणे : कवयित्री मोहिनी कुलकर्णी (संभाजीनगर), कवयित्री भाग्यश्री बागड (गुजरात), कवी रावसाहेब मते (संभाजीनगर), कवयित्री शुभांगी पाटील (नाशिक), कवी अमोल चिने (नाशिक), लेखिका सुवर्णा शिनगारे (धाराशिव), कवयित्री वृषाली देवकर (परतवाडा), कवी काशिनाथ साळुंखे (धुळे), कवयित्री सोनल इचाळे (नाशिक), कवयित्री सुनीता सांगळे (सिन्नर), कवी विष्णू वाघ (सिन्नर), कवयित्री जयश्री थोरवे (भोसरी), कवी योगेश हरणे (पुणे), कवी सतीश वाडेकर (अकोला), कवी डॉ. सतीश घाडगे (बीड), निसर्गकवी लक्ष्मण शिंदे (भोर), कवी संजय जगताप (पिंपरी-चिंचवड), गझलकार गिरीश जोशी (संभाजीनगर), लेखिका वंदना कुलकर्णी (सोलापूर), कवी दत्ताहरी कदम (नांदेड), कवी गणेश निकम (चाळीसगाव), साहित्यिक राहुल मुंढे (टिटवाळा), कवी श्रीशैल चौगुले (सांगली), बाळासाहेब गिरी (नाशिक), कवी संजय धनगव्हाळ (धुळे), सूत्रसंचालक गजानन उफाडे (कात्रज), कवी गोरक्षनाथ पालवे (नाशिक), लेखक प्रशांत वाघ (येवला), प्रा. ज्ञानेश्वर कुलकर्णी (वतनी), कवी संदीप तोडकर (रत्नागिरी), व्याख्याते सुनीलकुमार सोळंके (संभाजीनगर), कवयित्री सुनीता कपाळे (संभाजीनगर), कवयित्री माधुरी चौधरी (संभाजीनगर), सूत्रसंचालक गजेंद्रसिंह राजपूत (बुलढाणा), लेखक प्रा. रमेश गटकळ (माजलगाव), लेखक रामदीप डाके (माजलगाव), कवयित्री सुरेखा काळुसे (बुलढाणा), लेखक सचिन होळकर (लासलगाव), कवी रविकांत शार्दूल (नाशिक), कवी रंजन कापडणीस (नाशिक), लेखिका वासंती दुर्गाडे (सासवड), कवी निलेश वाणी (धुळे), वऱ्हाडी कादंबरीकार श्याम ठक (बार्शी टाकळी), गझलकार निलेश कवडे (अकोला), कवयित्री सरिता कलढोणे (जुन्नर) आणि लेखिका, कवयित्री व प्रकाशक संजना मगर (पिंपरी-चिंचवड).
संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सुप्रसिद्ध गायिका ह.भ.प. सौ. पूनमताई नळकांडे-पाटील यांना संत ज्ञानेश्वर महाराज जन्मसंस्थानच्या वतीने ‘मुक्ताई स्वरयोगिनी पुरस्कार २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले. मान्यवरांच्या शुभहस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. दिवसभर गझल, कविता, साहित्यिक संवाद आणि पुरस्कार सोहळ्याचा आनंद घेतल्यानंतर संमेलनाची सांगता वारकरी भजन आणि अभंगवाणीच्या सुरेल मेजवानीने झाली. गायिका पूनमताई नळकांडे-पाटील यांनी आपल्या सुमधुर आणि प्रभावी गायनाने उपस्थित रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. त्यांच्या स्वरांतून सादर झालेल्या भक्तिगीतांनी आणि वारकरी अभंगांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले. टाळ-मृदंगाचा गजर, अभंगांची स्वरमाधुरी आणि विठ्ठलनामाचा जयघोष यामुळे साहित्यिक भक्तिरसात तल्लीन झाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र मगर यांनी ओघवत्या वाणीने आणि प्रभावी निवेदनाने केले. प्रसंगानुरूप शब्दांची निवड, अचूक समयसूचकता आणि साहित्यिक जाण यांचा सुरेख संगम त्यांच्या निवेदनातून अनुभवायला मिळाला.
त्रिपुरारी पौर्णिमा आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचे अनोखे आध्यात्मिक नाते आहे. या पवित्र दिवसाचे औचित्य साधून संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले. हजारो दीपांच्या प्रकाशाने मंदिर परिसर उजळून निघाला. दीपांच्या लखलखत्या प्रकाशात भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माचा अद्भुत सोहळा अनुभवायला मिळाला. जणू ज्ञानोबारायांच्या विचारांचा प्रकाशच सर्वदूर पसरत होता. या दीपोत्सवाने संमेलनाची अत्यंत प्रसन्न आणि मंगलमय वातावरणात सांगता झाली. या संपूर्ण साहित्य संमेलनाचे अभूतपूर्व आणि प्रभावी सूत्रसंचालन बाळासाहेब गिरी आणि स्नेहल येवला यांनी केले.
आपल्या ओघवत्या वाणीने, समयसूचकतेने, साहित्यिक संदर्भांनी आणि प्रसंगानुरूप बहारदार निवेदनाने त्यांनी संमेलनातील प्रत्येक कार्यक्रमाला वेगळी उंची प्राप्त करून दिली. या संमेलनाचे उत्कृष्ट, भव्य आणि नियोजनबद्ध आयोजन लोककवी विजय पोहनेरकर, लेखिका अलका बोर्डे, कवयित्री अश्विनी वाकणकर, उद्योजक शांताराम गायकवाड आणि लेखक संदीप राक्षे यांनी केले होते. संमेलनाच्या संकल्पनेपासून प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत प्रत्येक बाबीचे सूक्ष्म नियोजन, मान्यवरांचे स्वागत, साहित्यिकांचा सन्मान, पुस्तक प्रकाशन, पुरस्कार वितरण आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची उत्तम सांगड या आयोजकांनी घातली. त्यांच्या सामूहिक प्रयत्नांतून श्रीक्षेत्र आपेगावच्या पावन भूमीत साहित्य, संस्कृती आणि अध्यात्माचा अविस्मरणीय सोहळा साकार झाला. संत ज्ञानोबारायांच्या विचारांचा वारसा जपत साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, श्रीक्षेत्र आपेगाव हे संत ज्ञानोबाराय, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत मुक्ताई यांचे जन्मगाव माहित व्हावे, आध्यात्म विवेकी ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांचे कार्य जनसामान्यांपर्यंत पोहोचावे, साहित्यसेवेचा गौरव करणे आणि नव्या पिढीला साहित्यनिर्मितीसाठी प्रेरित करणे, हा या संमेलनाचा मुख्य उद्देश होता.
Comments are closed.