NGN News
Latest Marathi News

प्रपंच व परमार्थाची सांगड घालणारा समर्पित कार्यकर्ता हरपला

शरदराव ढोले यांच्याकडून रमेशराव गायधनी यांना सुमनांजली


** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : प्रापंचिक जीवनात वैयक्तिक स्वार्थाला तीलांजली देऊन संपूर्ण समाजालाच आपले घर मानणाऱ्या दुर्मिळ संघ समर्पित कार्यकर्त्यांपैकी रमेशराव गायधनी एक होते. समष्टीसाठी स्वत:चे तन-मन आणि धन अर्पण करताना त्यांनी प्रपंच व परमार्थाची अनोखी सांगड घातली. समाजपुरुषाच्या अखंड सेवेतच त्यांनी परमार्थ साधला, अशा शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय धर्मजागरण समन्वय संयोजक शरदराव ढोले यांच्या यांनी रमेशराव गायधनी यांना श्रद्धांजली अर्पण केली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्व शहर जिल्हा कार्यवाह आणि ज्येष्ठ स्वयंसेवक रमेशराव गायधनी यांच्या श्रद्धांजली सभेत ते बोलत होते. गंगापूर रोडवरील शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी सभागृहात या बुधवारी सायंकाळी या शोकसभेचे आयोजन संघ परिवार व समविचारी संघटनांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर शहर जिल्हा संघचालक डॉ. विजय मालपाठक , विभाग संघचालक कैलासनाना साळुंखे , अखिल भारतीय धर्मजागरण प्रमुख शरदराव ढोले, सावानाचे पदाधिकारी आणि कै.रमेश गायधनी यांचे बंधू सुरेश गायधनी उपस्थित होते.

शरदराव ढोले म्हणाले , संघ जपायचा कसा, संघ जगायचा कसा, याचा वस्तुपाठ म्हणजे रमेशराव यांचे जीवन होते. समाजाच्या अखंड सेवेत प्रपंचाची काडी अन काडी आणताना त्यांनी प्रपंच व परमार्थाची अनोखी सांगड घालत समष्टीचे अद्वैत तत्वज्ञान प्रत्यक्ष जाणून दाखविले.
रमेशराव गायधनी व गायधनी कुटुंबियांच्या संदर्भातील जुन्या आठवणी जागविताना शरदराव ढोले यांनी अनेक जुन्या आठवणींचा भावनिक पट उलगडला. नाशिकमधील जुन्या पिढ्यांमधील संघकार्यात नाशिककरांचे योगदान, गायधनी कुटुबियांचे योगदान, कार्यकर्त्यांची जोडणी, कार्यकर्त्यांच्या जीवनातील चढउताराच्या प्रसंगात उभारले जाणारे पाठबळ, संघाच्या भूमिकेतून सामाजिक-सांस्कृतिक व राजकीय परिघातून विविध प्रसंगांच्या आठवणींनादेखील यावेळी शरदराव ढोले यांनी यावेळी उजाळा दिला.

या श्रद्धांजली सभेत लोकमान्य शिक्षण मंडळाचे रामभाऊ महाजन, डॉ. हेडगेवार पतसंस्थेचे बाळासाहेब सुराणा, नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे मारुती कुलकर्णी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ॲड. सुहास जपे, राष्ट्र सेविका समितीच्या भाग्यश्री साठे, भगूर शिक्षण मंडळाचे सचिन पाटील , भाजपाचे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, आयुर्वेद सेवा संघ व जनजाती कल्याण आश्रमाचे डॉ. मधुकर आचार्य , श्रीगुरुजी रुग्णालयाचे प्रविण बुरकुले , रा.स्व. संघाचे प्रांत कार्यकारिणी सदस्य दिलीपराव क्षीरसागर , विजयाताई पाटील, आमदार सीमा हिरे, गोविंदराव यार्दी, सावानाचे विश्वस्त मंडळ सदस्य आणि कै. रमेशराव गायधनी यांचे कनिष्ठ बंधू सुरेश गायधनी यांनी यावेळी भावना व्यक्त केल्या.

रा.स्व. संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांनी डिजीटल माध्यमाद्वारे व्यक्त केलेला संदेश यावेळी सभागृहात प्रसारित करण्यात आला. या संदेशात जोशी म्हणाले, कै. रमेशराव गायधनी यांचे जीवन हे संघकार्याचा आदर्श होते. मितभाषी असलेल्या या व्यक्तिमत्वाने स्वत:चे संपूर्ण जीवन संघकार्यासाठी समर्पित केले. इतरांवर निरपेक्षपणे केलेले प्रेम आणि निस्पृहपणे असंख्य समाजघटकांशी केलेली मैत्री हा त्यांच्या संघकार्याचा कणा होता. आणिबाणीच्या अतिशय कठीण कालखंडातदेखील संघ कार्यकर्त्यांच्या पाठीशी रमेशरावांसह गायधनी कुटुंब अतिशय कणखरपणे उभे राहीले होते.

..अन वातावरण बनले भावूक

सुमारे पाच दशकांपेक्षाही अधिक काळापासून कै. रमेशरावांच्या संपर्कात आलेले विविध कार्यकर्ते, संघ परिवारातील विविध सामाजिक सांस्कृतिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदींना यावेळी अश्रू अनावर झाले होते. यामुळे सभागृहातील वातावरण भावूक बनले.

Comments are closed.