NGN News
Latest Marathi News

काँग्रेस वैद्यकीय मदत कक्ष : प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड प्रदेशाध्यक्षपदी फेरनियुक्त

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून राज्यभरातील गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचार, शासकीय आरोग्य योजनांचा लाभ, आर्थिक सहाय्य व योग्य उपचारांसाठी मार्गदर्शन मिळवून देण्याच्या उद्देशाने संघटनात्मक विस्ताराला गती देण्यात आली आहे. या अनुषंगाने राज्यातील विविध जिल्हे व शहरांमध्ये ३० जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्षांच्या नियुक्त्यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मान्यता दिली आहे.

वैद्यकीय मदत कक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. ज्ञानेश्वर रामकृष्ण गायकवाड यांची त्यांच्या आतापर्यंतच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करत प्रदेशाध्यक्षपदी फेरनियुक्ती करण्यात आली आहे. तसेच संघटनात्मक कार्याचा विस्तार आणि वैद्यकीय मदत कक्षाच्या कामाची व्याप्ती वाढविण्याच्या दृष्टीने त्यांच्याकडे विदर्भ विभागाची संपूर्ण जबाबदारीही सोपविण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय मदत कक्षाचे संघटनात्मक जाळे अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रेरणेने वैद्यकीय मदत कक्षाचे काम राज्यभर विस्तारले जात आहे. प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड यांनी गेल्या काही महिन्यांत विविध जिल्ह्यांमध्ये पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, संघटनात्मक बांधणी आणि रुग्णसेवेच्या उपक्रमांना गती देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत.

या नियुक्त्यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील रुग्णांना स्थानिक स्तरावर मदत मिळणे अधिक सुलभ होणार असून, काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आरोग्यविषयक प्रश्नांना संघटितपणे हाताळण्यास मदत होणार आहे.

Comments are closed.