
विवाहाच्या नावाखाली शेतकऱ्याला अडीच लाखांना गंडा ; नऊ संशयितांविरोधात गुन्हा
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : एका २४ वर्षीय तरुण शेतकऱ्याला लग्नाच्या नावाखाली सुमारे अडीच लाख रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मोहोळ ( जि. सोलापूर ) पोलीस ठाण्यात नऊ संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर तो पुढील तपासासाठी वणी ( ता. दिंडोरी ) पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलिसांनी या टोळीतील संशयित महिलेला अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
प्राप्त माहितीनुसार, व्यवसायाने शेतकरी असलेल्या विशाल जयवंत धावणे ( २४, रा. नरखेड, ता. मोहोळ, जि. सोलापूर) याच्यासाठी वधू शोधण्याचे काम सुरू असताना तो सोलापूर येथील एका एजंटच्या संपर्कात आला. या एजंटने नाशिकमधील एका दलालाशी संपर्क साधून विशालसाठी मुलगी शोधल्याचे सांगितले. मात्र, संबंधित महिला आधीच विवाहित आणि तीन मुलांची आई असतानाही ती अविवाहित असल्याचा खोटा बनाव या टोळीने रचला. विशालच्या लग्नासाठी या टोळीने नियोजनबद्ध कट रचला होता. एका संशयित एजंटाला ५० हजार रुपये आणि नियोजित वधूच्या तथाकथित वडिलांना २ लाख ५० हजार रुपये देण्याचे ठरले होते. त्यानुसार विशालने त्यांना पैसेही दिले. त्यानंतर ७ जून २०२६ रोजी दिंडोरी तालुक्यातील कसबे वणी येथील एका मंदिरात विशाल आणि त्या महिलेचा विवाह लावून देण्यात आला.
मात्र विवाहानंतर विशाल यास प्रवासादरम्यान वस्तुस्थिती लक्षात आल्यानंतर धक्का बसला. विशालने सोलापूर ग्रामीणच्या मोहोळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. घटनास्थळ वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने हा गुन्हा वणी ( ता. दिंडोरी ) येथे वर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक गणेश कुटे यांनी दिली. वणी पोलिसांनी या ठकबाजी प्रकरणी एकूण ९ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
Comments are closed.