- नातेवाईकांनाही लक्ष्य केल्याचा आरोप; दोन्ही गटांत तुफान हाणामारी, ७ ते ८ जण जखमी
** एनजीएन न्यूज नेटवर्क
येवला : प्रेमविवाहाचा राग मनात धरून नवरीच्या नातेवाईकांनी भरलग्नात नवरदेव आणि त्याच्या नातेवाईकांच्या अंगावर डिझेल ओतून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार येवला शहरात घडल्याचा आरोप आहे. पारंपरिक विवाह सोहळा सुरू असतानाच दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या घटनेत सात ते आठ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती असून, या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
प्रेमविवाहानंतर पारंपरिक विवाह सोहळ्याचे आयोजन
प्राप्त माहितीनुसार, येवला येथील ऋषभ दीपक भगुंडे या तरुणाचे निफाड तालुक्यातील रामपूर नैताळे येथील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. या दोघांनी सप्टेंबर महिन्यात घरातून निघून प्रेमविवाह केला होता. विवाहाला सुमारे दोन महिने झाल्यानंतर नवरदेवाच्या नातेवाईकांनी पारंपरिक पद्धतीने विवाह सोहळा आयोजित करण्याचे ठरवले. त्यानुसार, येवला शहरातील एका लॉन्समध्ये जवळपास १०० ते २०० नातेवाईकांच्या उपस्थितीत विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
डिझेलचे कॅन आणल्याचा आरोप; लग्नमंडपात राडा
विवाह सोहळा सुरू असताना नवरीच्या नातेवाईकांनी प्रेमविवाहाचा राग मनात धरून डिझेलचे कॅन सोबत आणल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांनी नवरदेव आणि त्याच्या नातेवाईकांच्या अंगावर डिझेल ओतून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी वऱ्हाडी मंडळींनाही मारहाण झाल्याचे सांगण्यात येते. या प्रकाराला नवरदेवाच्या नातेवाईकांनी विरोध केल्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये जोरदार हाणामारी झाली. या संघर्षात सात ते आठ जण जखमी झाल्याची माहिती आहे.
पोलिसांकडून संशयित ताब्यात
लग्नमंडपात झालेल्या या गोंधळाचे काही व्हिडिओ उपस्थितांनी मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित केले. घटनेची माहिती मिळताच येवला शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत काही संशयितांना ताब्यात घेतले. दोन्ही बाजूंनी गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपांची सत्यता, घटनेमागील नेमकी कारणे आणि संबंधितांची भूमिका याबाबत पोलिस तपासानंतर अधिक स्पष्टता येणार आहे.
Comments are closed.