
** एनजीवन न्यूज नेटवर्क
नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापनाचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने राणेनगर येथील सेंट फ्रान्सिस हायस्कूलमध्ये गुरुवारी (दि. १६ ) सुसंवाद सत्राचे आयोजन करण्यात आले. नाशिक महानगरपालिकेचे निमंत्रित प्रतिनिधी आणि सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुनील पाटील यांनी इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना कचरा व्यवस्थापन, कचऱ्याचे वर्गीकरण आणि स्वच्छतेच्या सवयी यांविषयी मार्गदर्शन केले.
या सत्रात पाटील यांनी ओला, सुका, घन आणि घातक कचरा यांचे प्रकार समजावून सांगितले. कचऱ्याचे योग्य वर्गीकरण कसे करावे, प्लास्टिक कचऱ्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या आणि प्लास्टिकला पर्यायी उपाय यांची माहिती त्यांनी प्रात्यक्षिकांसह दिली. तसेच, दैनंदिन जीवनात स्वच्छतेच्या सवयी अंगीकारण्याचे आवाहन करताना त्यांनी ७ आर (7R) तत्त्वांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
विद्यार्थ्यांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून सत्रात उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्लास्टिक कचऱ्याचे विघटन कसे करता येईल आणि प्लास्टिकला कोणते पर्याय उपलब्ध आहेत, यांसारखे प्रश्न विचारून त्यांनी आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. प्रत्येक विद्यार्थ्याने स्वच्छतेच्या चांगल्या सवयी अंगीकारल्यास आजचा जागरूक विद्यार्थी उद्याचा सुजाण नागरिक बनू शकतो, असे पाटील यांनी सांगितले. शाळांमध्ये विविध विषयांवर अशा सुसंवाद सत्रांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मंजू पाटील आणि विभागप्रमुख शितल चिंचोलीकर यांचे सहकार्य लाभले.
Comments are closed.