
- मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचा उद्योगांशी संवाद; २०० प्रतिनिधींचा सहभाग
** एनजीएन न्यूज नेटवर्क
लासलगाव : राकेश बोरा
जिल्ह्यातील औद्योगिक आणि कृषी क्षेत्राला रेल्वे मालवाहतुकीची जोड देऊन व्यवसायाच्या नव्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातर्फे बुधवारी (ता. १४) नाशिक येथील इरीन (IRIEEN) सभागृहात ‘रेल्वे मालवाहतूक आणि लॉजिस्टिक्स उद्योग संवाद मेळावा २०२६’चे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात उद्योग, कृषी, लॉजिस्टिक्स आणि जिल्हा प्रशासनातील सुमारे २०० प्रतिनिधींनी सहभाग घेतला.
भुसावळ विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यात रेल्वे आणि औद्योगिक क्षेत्रातील समन्वय वाढविणे, मालवाहतुकीसाठी नवीन मार्गांचा शोध घेणे आणि उद्योगांच्या वाहतूकविषयक अडचणी सोडविणे यावर भर देण्यात आला.
उप वित्त सल्लागार व मुख्य लेखाधिकारी (वाहतूक) अरुण कुमार नायर, इरीनचे अतिरिक्त महासंचालक डी. एल. मीना यांच्यासह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच कल्याणी कास्ट टेक, कॉनकोर, महिंद्रा लॉजिस्टिक्स, अदानी सिमेंट, अल्ट्राटेक सिमेंट, मिंट लॉजिस्टिक्स आणि श्री रोडवेज यांसारख्या संस्थांच्या प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला.
मालवाहतुक सुविधांवर चर्चा
पुनीत अग्रवाल यांनी रेल्वेच्या सुरू असलेल्या आणि प्रस्तावित प्रकल्पांची माहिती देत मालवाहतूक सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्नशील असल्याचे सांगितले. ग्राहकांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यास प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपलब्ध मालवाहतूक रेक्स, वॅगन्स, लोडिंगची ठिकाणे आणि मालवाहतुकीत वाढ करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.
मेळाव्यात भारतीय रेल्वेच्या ‘५२ रिफॉर्म्स वॅगन पॉलिसी’विषयी माहिती देण्यात आली. नवीन मालप्रकारांची रेल्वेमार्फत वाहतूक, नवीन मार्गांचा विकास, लॉजिस्टिक्स संपर्कव्यवस्था बळकट करणे आणि मालवाहतूक अधिक किफायतशीर करणे याबाबत उद्योग प्रतिनिधींनी सूचना व प्रस्ताव मांडले.
नाशिक जिल्ह्यातील औद्योगिक विस्तार आणि कृषी उत्पादनांची मोठी उलाढाल लक्षात घेता रेल्वे मालवाहतुकीच्या विकासाला मोठा वाव आहे. उद्योगांच्या गरजांनुसार सेवा विकसित करून रेल्वे वाहतुकीला प्रोत्साहन देण्याचा निर्धार या मेळाव्यात व्यक्त करण्यात आला.
Comments are closed.