NGN News
Latest Marathi News

अस्सल पैठणीला आता बारकोड आणि लोगोचा साज

  • महाराष्ट्र शासनाचा निर्णय; ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी उचलले पाऊल
  • स्कॅन करताच मिळणार धागा, कारागीर आणि निर्मितीची माहिती

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक असलेल्या पैठणीची अस्सल ओळख आता अधिक सुलभ होणार आहे. अस्सल पैठणी आणि बाजारात विकल्या जाणाऱ्या सेमी पैठणी अथवा बनावट पैठणी यांतील फरक स्पष्ट करण्यासाठी राज्याच्या वस्त्रोद्योग विभागाने विशेष बारकोड आणि लोगो प्रणाली विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमामुळे पैठणी खरेदी करताना ग्राहकांची होणारी फसवणूक रोखण्यास मदत होणार आहे.

राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी नुकतीच याबाबत माहिती दिली. अस्सल पैठणीवर विशेष बारकोड देण्याबरोबरच तिच्या स्वतंत्र ओळखीसाठी लोगो तयार करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. बारकोड स्कॅन केल्यानंतर संबंधित पैठणीबाबतची महत्त्वाची माहिती ग्राहकाला उपलब्ध होईल. त्यामध्ये पैठणीसाठी वापरण्यात आलेल्या धाग्याचा तपशील, ती तयार करणारा कारागीर तसेच निर्मितीचे ठिकाण यांसारखी माहिती मिळण्याची अपेक्षा आहे.

येवल्याच्या पैठणीला विशेष ओळख
नाशिक जिल्ह्यातील येवला हे पैठणी निर्मितीचे प्रमुख केंद्र असून येथील हातमागावरील पैठणीला देश-विदेशात मोठी मागणी आहे. येवल्याच्या पैठणीला तिच्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरेनुसार स्वतंत्र आणि स्पष्ट ओळख मिळावी, यासाठी विशेष लोगो विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. केंद्र सरकारच्या अधिकृत पोर्टलवरही पैठणीला नाशिक जिल्ह्याशी संबंधित GI उत्पादन म्हणून नमूद करण्यात आले आहे.

बनावट पैठणीच्या विक्रीला बसणार लगाम
सध्या बाजारात अस्सल पैठणीच्या नावाखाली सेमी पैठणी, मशीनवर तयार केलेल्या तसेच बनावट पैठण्यांची विक्री होत असल्याच्या तक्रारी आहेत. पारंपरिक हातमागावर तयार होणारी पैठणी आणि इतर प्रकारातील फरक सामान्य ग्राहकाला सहजपणे ओळखता येत नाही. त्यामुळे अनेकदा ग्राहकांकडून मोठी रक्कम मोजल्यानंतरही अपेक्षित दर्जाची अथवा अस्सल पैठणी मिळत नाही.
नवीन बारकोड प्रणालीमुळे खरेदीदाराला पैठणीची माहिती थेट पडताळून पाहता येणार असल्याने अशा फसवणुकीला आळा बसण्याची शक्यता आहे. अस्सल कारागिरांच्या उत्पादनाला योग्य ओळख आणि बाजारपेठ मिळण्यासही यामुळे मदत होईल.

कारागिरांनाही होणार फायदा
पैठणी निर्मिती ही केवळ वस्त्रनिर्मिती नसून महाराष्ट्राच्या पारंपरिक कला आणि कौशल्याचा महत्त्वपूर्ण वारसा आहे. अस्सल पैठणी तयार करण्यासाठी मोठा कालावधी आणि कुशल कारागिरांचे परिश्रम लागतात. उत्पादनाची डिजिटल ओळख निर्माण झाल्यास कारागिरांचे योगदान ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास मदत होऊ शकते.
यामुळे अस्सल पैठणीचा ब्रँड अधिक मजबूत होण्याबरोबरच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही तिची विश्वासार्हता वाढण्याची अपेक्षा आहे.

जीआय मान्यतेलाही डिजिटल ओळखीची जोड
‘Paithani Saree & Fabrics’ या उत्पादनाची भौगोलिक संकेतांक अर्थात GI नोंदणी अस्तित्वात असून ‘Paithan’s Paithani’ ही नोंदणी त्यात विलीन करण्यात आल्याची नोंद भारताच्या बौद्धिक संपदा विभागाच्या अधिकृत GI नोंदीत आहे. आता प्रस्तावित बारकोड आणि लोगो व्यवस्थेमुळे या पारंपरिक उत्पादनाच्या ओळखीला अधिक आधुनिक आणि तांत्रिक आधार मिळू शकतो

@ महाराष्ट्राचे महावस्त्र म्हणून जगभर परिचित असलेल्या पैठणीला बारकोड आणि लोगो लावण्याचा शासकीय निर्णय स्वागतार्ह आहे. यामुळे बनावट साड्या ओळखणे शक्य होईल आणि पैठणी बाबत ग्राहकांची फसवणूक टळेल. देशातील काही राज्यांत, विशेषतः दक्षिण आणि उत्तरेत, साड्यांची पैठणी म्हणून विक्री केली जाते. म्हणूनच अशा प्रकारांना महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाने निश्चितच आळा बसेल.

  • संजय सोनी, संचालक, सोनी पैठणी, येवला/नाशिक

Comments are closed.