NGN News
Latest Marathi News

सिंहस्थ तयारीत नियोजनाचा ‘कुंभकर्ण’ ! ( सारीपाट/मिलिंद सजगुरे )

** एनजीएन न्यूज नेटवर्क

** सिंहस्थासाठी 35 हजार कोटींची तरतूद प्रश्नचिन्हांकित.. पृथ्वीराज चव्हाण

** सिंहस्थ संबंधित कामांत मोठा भ्रष्टाचार.. संजय राऊत

** सिंहस्थाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर निधीचा अपव्यय.. हर्षवर्धन सपकाळ

राज्याच्या राजकारणात थोड्या-बहुत शीर्षस्थ भूमिकेत असलेल्या उपरोक्त त्रिमूर्तीने नाशिक-त्र्यंबकमधील उंबरठ्यावर असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याबाबत केलेली ही विधाने. या विधानांतील समान धागा म्हणजे काहीतरी विपरित घडतेय आणि सत्य-पारदर्शकतेला छेद देत शासन-प्रशासन वस्तुस्थिती दडवून ठेवत असण्याबाबतचा वहिम. दुसऱ्या अर्थी सिंहस्थाच्या नावाखाली मोठा निधी खर्च केला जात असून त्यातील कामे, निविदा, कंत्राटे आणि खर्चाची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक नाहीत, या मुद्द्यावर विरोधकांनी बोट ठेवले आहे. राज्याचे मुखिया देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या ‘स्टाईल’ने आरोपांवर फुली मारत, सर्व माहिती सार्वजनिक आहे, विरोधकांनी ती तपासून घ्यावी असे प्रतिआव्हान दिलेय. शिवाय, सिंहस्थ कुंभमेळ्याला बदनाम करण्यासाठी सातत्याने आरोप करून जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याची ही जाणीवपूर्वक रणनीती असल्याचा पलटवार केला.

वर्षभरावर येेऊन ठेपलेला सिंहस्थ कुंभमेळा नामक लोकोत्सव नाना कारणांनी चर्चेत आला आहे. कुंभसाठीचा निधी, त्यामधील कथित भ्रष्टाचार, विकासकामांसाठी देण्यात आलेली कंत्राटे, गावभर खोदून ठेवलेले रस्ते, उपलब्ध रस्त्यांवरील खड्डे, खड्ड्यांपायी गेलेले आठ बळी या चर्चा आंतर राष्ट्रीय स्तरावरील या लोकोत्सव नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या ठरत आहेत. विरोधी पक्षांतील तीन बड्या नेत्यांनी व्यक्त केलेला संशय म्हणजे त्यांच्याशी संबंधित स्थानिकांनी दिलेल्या ‘इनपुटस’चा परिणाम आहे. त्याचा थेट अर्थ नेतेमंडळींनी केलेले आरोप अगदीच निराधार किंवा राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे म्हटल्यास ती बाब विचारहीन ठरेल. बरोबर वर्षभराने कुंभमेळ्यातील अमृतस्नानारंभ होणार असताना पन्नास टक्क्यांहून अधिक कामे एकतर अर्धवट अवस्थेत किंवा पूर्णपणे बाकी असल्याचे स्पष्ट आहे. ही कामे पूर्ण होण्याची मर्दमुकी गाजवली देखील जाईल; मात्र, त्यांची गुणवत्ता, टिकाऊपण यांबाबतची खात्री काय? मुख्यमंत्र्यांच्या लेखी, ज्या दिवशी ही कामे पूर्ण होतील, त्या दिवशी हीच मंडळी आपल्याला फुलांचे हार देखील घालतील. मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य वावगे मूळीच नाही. मात्र, गुणवत्तेत बोंबाबोंब आढळल्यास त्याची जबाबदारी हार घालून घेणारे घेतील की कंत्राटदारांकडे अंगुली निर्देशन करून मोकळे होतील, हेदेखील स्पष्ट झाले असते तर बरे शहरवासियांना बरे वाटले असते.

मूळात, नाशिक-त्र्यंबकला दर बारा वर्षांनी सिंंहस्थ कुंभमेळ्याचा साज चढतो, हे शाश्वत सत्य आहे. ही बाब जगजाहीर असताना देखील कोणती कामे किती वेळात पूर्ण करावयाची आहेत, याचे आडाखे प्रशासनाकडे नव्हते काय ? एखाद्या विकासकामाचे अथपासून इतिपर्यंतच्या प्रवासाचे नियोजन जर शास्त्रोक्त पध्दतीने झाले असते तर आज उद्भवलेली बव्हंशी परिस्थिती अन् तदनुषंगिक चर्चा थांबवता आली असती. शाब्दिक आरोप फेटाळण्यासाठी शब्दच पुरेसे असल्याने वेळ मारून नेता येते. पण ऐन पावसाळ्यात खोदून ठेवलेल्या रस्त्यांमुळे हैराण झालेले नाशिककर, सातत्याने होणारी वाहतुककोंडी, लहान-मोठ्या अपघातांनी घेतलेले आठ बळी, शेकडोंच्या संख्येत झालेले जखमी या मुद्द्यांना उत्तर देण्यासाठी ना प्रशासनातील, ना शासनातील कोणी कर्ते-करविते पुढे आल्याचे आणि त्याची नैतिक जबाबदारी घेतल्याचे स्मरते. यशाचे पितृत्व स्वीकारायला डझनभर तयार असतात, अपयश मात्र नेहमीच अनाथ असते. याच प्रमेयाची प्रचीती सध्या इथे दिसून येतेय.

प्रस्तावित लोकोत्सवात देश-विदेशांतून कोट्यवधी भाविक, पर्यटक येणार म्हणून साजेसे शहर तयार करणे हा जबाबदारीचा भाग आहे. या सर्वांच्या येण्याने व्यवस्थेवर पडणारा ताण असह्य होवू नये म्हणून योग्य त्या पायाभूत सुविधा प्रदान करणे कर्तव्यपरायणता अधोरेखित करते, याची पूर्तता केली, ते काम मार्गी लावले म्हणून बढाया मारण्यात हाशील नाही. त्यामध्ये आत्मप्रौढी, श्रेयवाद डोकावण्याचे कारण तर दूरच. विरोधकांचे आरोप राजकीयदृष्ट्या प्रेरित असतील देखील. पण मग सिंहस्थापोटी खर्च झालेल्या निधीसंदर्भात श्वेतपत्रिका काढण्यात येणार का? या मुद्द्यावर मुख्यमंत्री बोलले असते तर बहुधा नाशिककरांसह चव्हाण-राऊत-सपकाळ देखील सुखावले असते. गेल्या पाच-सहा कुंभमेळ्यांचे साक्षीदार राहिलेल्या मोजक्या धुरीणांच्या मते आजवर असा सावळागोंधळ कधी पाहिला नव्हता. कर्तृत्वाचे वाभाडे काढणारे हे नकोसे प्रमाणपत्र स्वीकारण्यास कोणी पुढे येण्याची शक्यता धूसर आहे.

सारांशात, नाशिक-त्र्यंबक शहरांत होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळा विकासकामे नियोजनात प्रशासकीय धांदल दिसून येण्याबद्दल मुळीच दुमत असणार नाही. सहा महिन्यांनी नाशिक सर्वांगसुंदर सुविधांनी नटले-मुराडलेले असेलही. मात्र, यानिमित्त झडलेल्या चर्चा, त्यामधील दृशादृष्य वास्तव आणि जबाबदाऱ्या निश्चित न करण्याची वृत्ती राज्याच्या मुखीयांसह अंतर्भूत सर्व व्यवस्थांना अंतर्मुख करून गेली. उद्या कुंभ यशस्वी झाला म्हणून पाठ थोपटवून घेणारे यापुढील नियोजनात तरी सुधारणा करण्याचे शहाणपण दाखवतील आणि कितीही निधी आला तरी त्यामध्ये एका पैशाचा भ्रष्टाचार झाला नाही याची पुरेशी ग्वाही देवून शहरवासीयांच्या विश्वासाला पात्र ठरतील, असा आशावाद यानिमित्त व्यक्त करूयात !

Comments are closed.