
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : प्रियकरासोबत विवाह जमवून देण्याचे आमिष दाखवत महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी एका भोंदूला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. नाशिकच्या अमरधाम स्मशानभूमीत मध्यरात्री अघोरी पूजा करून पीडित महिलेकडून 77 हजार रुपये उकळल्याचा आरोप विशाल रामदास खडांगळे नामक या भोंदूवर आहे. या घटनेने शहरभर खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, पीडित महिला गुजरातमधील बलसाड येथून प्रियकरासोबत नाशिकमध्ये आली होती. प्रियकर जितू पवार याच्यासोबत चार वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचा महिलेने दावा केला आहे. तथापि, प्रियकराने लग्नासाठी नकार दिल्यानंतर संपर्कात आलेल्या या भोंदूने महिलेला लग्न जमवून देण्याचे आश्वासन दिले. यासाठी अमरधाम स्मशानभूमीत मध्यरात्री अघोरी पूजा घालण्याचा घाट घालण्यात आला. पुजेदरम्यान जळालेल्या प्रेताची राख, लिंबू आणि लाह्या महिलेच्या अंगावर फेकण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. पूजेच्या बदल्यात भोंदूने महिलेकडून 77 हजार रुपये उकळले. पूजा करूनही लग्न न झाल्याने फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आल्यानंतर पैसे परत मागितल्यावर भोंदू आणि साथीदाराकडून दमदाटी तसेच मारहाणीचा आरोप करण्यात आला.
त्यानंतर संबंधित महिलेने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मदतीने भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. जादूटोणाविरोधी कायदा आणि अन्य कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी भोंदू खडांगळे आणि त्याचा साथीदार जितू पवार दोघांनाही अटक करण्यात आली. भोंदू आणि त्याचा साथीदार यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी आणि पीडितेला न्याय मिळावा म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे, राज्य सदस्य कृष्णा चांदगुडे, प्रल्हाद मिस्त्री, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. आशा लांडगे, महेंद्र दातरंगे, रंजन लोंढे आदींनी प्रयत्न केले.
Comments are closed.