- जन्मजात हृदयविकार असलेल्या बालकांवर होणार मोफत उपचार
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
जन्मजात हृदयविकारग्रस्त म्हणजेच हृदयाला छिद्र असलेल्या बालकांसाठी येत्या शुक्रवारी (दि. २४) आणि शनिवारी (दि. २५) एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये मोफत हृदयविकार उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती एसएमबीटी हार्ट इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. गौरव वर्मा यांनी दिली. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य उपक्रमाअंतर्गत हृदयविकार आढळलेल्या बालकांवर एसएमबीटी रुग्णालयात पूर्णपणे मोफत उपचार केले जातात. दरमहा आयोजित होणाऱ्या या विशेष शिबीरांच्या माध्यमातून आतापर्यंत अडीच हजारांहून अधिक बालकांवर यशस्वी हृदयोपचार करण्यात येथील तज्ज्ञांना यश आले आहे.
लहान मुलांमध्ये जन्मजात हृदयरोगाचे प्रमाण मोठे असून दर हजार जन्मांमागे हे प्रमाण ६ ते १२ टक्के आढळते. भारताच्या जन्मदराचा विचार करता दरवर्षी सुमारे १.५ लाखांपेक्षा जास्त बालके ‘कन्जनायटल हार्ट डिसीज’ घेऊन जन्माला येतात. लहान मुलांमधील आजारांमध्ये बालहृदयरोगाचा क्रमांक वरचा असला, तरी यावर उपचार करणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांची आजही मोठी कमतरता भासते. ग्रामीण भागातील रुग्णांना उपचारासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा मुंबईसारख्या मोठ्या शहरांत जावे लागते. हा त्रास कमी करण्यासाठी एसएमबीटी हॉस्पिटलने पुढाकार घेतला असून गेल्या दोन वर्षांत १,५०० हून अधिक शिबीरे आयोजित करून हजारो बालकांवर मोफत उपचार केले आहेत.
दूध पिताना किंवा खेळताना बाळ लवकर थकणे, खूप घाम येणे, वयाच्या मानाने वजनात अपेक्षित वाढ न होणे, वारंवार सर्दी, खोकला किंवा फुफ्फुसाचे संसर्ग (न्युमोनिया) होणे, ओठ, जीभ, नखे किंवा त्वचा निळसर पडणे (सायनोसिस), श्वास घेताना त्रास होणे किंवा धाप लागणे आणि हृदयाचे ठोके अत्यंत जलद चालणे या प्रमुख लक्षणांचा समावेश होतो. अशी लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांनी या शिबिरात भेट देऊन डॉक्टरांचा मोफत सल्ला आणि मार्गदर्शन घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
दर महिन्याच्या शेवटच्या शनिवार आणि रविवारी बालहृदय विकारांवर विशेष लक्ष केंद्रित करून उपचार केले जातात, ज्यामध्ये ‘डिव्हाईस क्लोजर’ उपचारांचाही समावेश आहे. शासकीय योजनांशी संलग्न असलेल्या एसएमबीटी चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये सर्व मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याने, शुक्रवारी आणि शनिवारी होणाऱ्या या दोन दिवसीय शिबीराचा जास्तीत जास्त गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. बालकांमध्ये हृदयाशी संबंधित काही लक्षणे आढळल्यास पालकांनी तात्काळ हॉस्पिटलशी संपर्क साधावा.
Comments are closed.