
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचे निर्देशनुसार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, प्रादेशिक कार्यालय, नाशिक यांच्या वतीने “घनकचरा व्यवस्थापन नियम, २०२६” या विषयावरील एकदिवसीय प्रादेशिक कार्यशाळेचे आयोजन शुक्रवारी निमा कॉन्फरन्स हॉल येथे करण्यात आले. नव्याने अधिसूचित झालेल्या घनकचरा व्यवस्थापन नियम, २०२६ ची प्रभावी अंमलबजावणी, विविध भागधारकांमध्ये जनजागृती निर्माण करणे तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांना मार्गदर्शन करणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाची सुरुवात सहभागींच्या नोंदणीने झाली. त्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी विद्यासागर किल्लेदार यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सदर कार्यक्रमाचे उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे शास्त्रज्ञ श्री शशिकांत लोखंडे तसेच निमा चे अध्यक्ष आशिष नहार, आयमाचे अध्यक्ष राजेंद्र पानसरे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी प्रणव पाखले, नाशिक महानगर पालिकेचे डॉ आवेश पालोड, जिल्हाधिकारी कार्यालयाचे सह आयुक्त (नगरपालिका प्रशासन) श्री गोसावी आदी उपस्थित होते. सुरवातीला दीपप्रज्वलन करून मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात स्वच्छ, शाश्वत व वैज्ञानिक घनकचरा व्यवस्थापनासाठी सर्व संबंधित घटकांनी समन्वयाने कार्य करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. नव्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करून पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकास साधण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यशाळेत विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
श्री. शशिकांत लोखंडे, शास्त्रज्ञ, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB), पुणे यांनी घनकचरा व्यवस्थापन नियम, २०२६ मधील प्रमुख तरतुदी, विविध भागधारकांच्या जबाबदाऱ्या आणि अनुपालनाबाबत सविस्तर माहिती दिली.
नाशिक वेस्ट मॅनेजमेंट प्रा. लि. यांनी नगरपालिका घनकचऱ्याचे संकलन, वर्गीकरण, वाहतूक आणि प्रक्रिया याबाबत सादरीकरण केले.
भूमी ग्रीन एनर्जी प्रा. लि. यांनी कंपोस्टिंग, बायोमिथेनेशन आणि वेस्ट-टू-एनर्जी यांसारख्या वैज्ञानिक कचरा प्रक्रिया तंत्रज्ञानाची माहिती दिली.
श्री. साजी थॉमस, लाह्स ग्रीन इंडिया प्रा. लि., ठाणे यांनी घनकचरा व्यवस्थापनातील यशस्वी उपक्रम व सर्वोत्तम पद्धती (Best Practices) याविषयी मार्गदर्शन केले.
श्री. जयंत पाठक, प्रादेशिक संचालक, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, नागपूर यांनी घनकचरा व्यवस्थापन नियम, २०२६ ची सविस्तर ओळख करून देत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जबाबदाऱ्यांवर प्रकाश टाकला.
श्री. कमलेश भगत, सहाय्यक प्राध्यापक, गुरु गोबिंद सिंह कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सेंटर, नाशिक यांनी नियमांअंतर्गत निरीक्षण, अहवाल सादरीकरण आणि अंमलबजावणी यंत्रणेची माहिती दिली.
श्री. अजित कुडे, अवनी एंटरप्रायझेस यांनी शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी एकात्मिक घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रभावी उपाययोजनांवर मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या शेवटी सहभागी प्रतिनिधींनी विविध प्रश्न उपस्थित करून सूचना मांडल्या. त्यावर तज्ज्ञांनी सविस्तर उत्तरे दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समारोपपर मार्गदर्शनानंतर आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यशाळेस नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती, स्थानिक स्वराज्य संस्था, उद्योगाचे प्रतिनिधी, विविध शासकीय विभाग, तांत्रिक तज्ज्ञ, पर्यावरण क्षेत्रातील अधिकारी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
Comments are closed.