NGN News
Latest Marathi News

महिला भ्रष्टाचाराकडे का वळताहेत ? ( विशेष/मीनाक्षी जगदाळे )

** एनजीएन न्यूज नेटवर्क

सध्याच्या काळात महिलांनी सर्वच क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. हुशारी, बुद्धिमत्ता, कर्तृत्व, जिद्द, मेहनत कश्यातच कमी नं पडता घर संसार सांभाळून महिला स्वतःचे करिअर घडवत आहेत. मात्र, दुर्दैवाने काही प्रकरणांमध्ये महिलांचा भ्रष्टाचार किंवा चुकीच्या मार्गांकडे कल वाढत असल्याचे दिसून येत आहे. जेव्हा एखादी व्यक्ती आर्थिकदृष्ट्या सक्षम असूनही भ्रष्टाचाराकडे वळते, तेव्हा त्यामागे केवळ ‘पैसा’ हे एकमेव कारण नसून अनेक खोलवर रुजलेली मानसशास्त्रीय कारणे असतात.

या विषयाचे सविस्तर विश्लेषण आज आपण या लेखामार्फत करणार आहोत. महिलांच्या भ्रष्टाचारामागील मानसशास्त्रीय कारणे पहिल्यास चंगळवाद, मौज मजा, मोठेपणा मिरवणे आणि सामाजिक प्रतिष्ठा!यासाठी सर्व काही पणाला लावण्याची तयारी होय.

आजच्या सोशल मीडियाच्या युगात ‘दिखावा’ करण्याकडे कल वाढला आहे. उच्च जीवनशैली, ब्रँडेड वस्तू आणि महागड्या गाड्या, उच्च राहणीमान  म्हणजे यशस्वी होण्याचे लक्षण, असा एक चुकीचा समज निर्माण झाला आहे. आपल्या सहकाऱ्यांच्या किंवा मित्रांच्या बरोबरीने राहण्याच्या दबावातून, बरोबरीतून गरजेपेक्षा जास्त खर्च करण्यासाठी चुकीच्या मार्गांचा अवलंब केला जातो. 

अगदी साधे सण वार, छोटे छोटे कार्यक्रम सुद्धा सर्व महिला खूप मोठया स्वरूपात आजकाल साजऱ्या करू लागल्या आहेत. या सगळ्या उत्सवांचे शूटिंग, फोटो, रील बनवून दररोज समाज माध्यमातून दाखवले जातात. मोठं मोठी घरे, त्याला केलेली सजावट, त्या घरातील नटून थटून तयार झालेल्या महिला, घरातील महागड्या वस्तू नं कळत सर्वसामान्य महिलांच्या मनात असुया तयार करतात. प्रत्येक महिला दुसऱ्या महिलांचा मेकअप, साडया, ती कुठे कुठे फिरायला गेलीं हे सर्व आवर्जून बघत असते. मला हे सर्व का मिळाले नाही?  का मिळवता आले नाही? माझ्या घरात असे वातावरण अशी सुबत्ता का नाही? हा विचार आजकाल महिलांना सदैव भेडसावत असतो. मोबाईल सतत सोबतीला असल्याने ही रिस, खुन्नस, हेवा रोज मनात साठत असतो. आपनसुद्धा हे सगळं मिळवायचं च या अट्टाहासापोटी महिला चुकीच्या दिशेला वळताना दिसतात.

कौटुंबिक दबाव आणि जबाबदारी ही देखील प्रमुख कारणे महिलांनी चुकीच्या मार्गाने पैसे मिळवण्यासाठी कारणीभूत आहेत. अनेकदा महिलांवर कुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याचा किंवा मुलांच्या महागड्या शिक्षणाचा भार असतो. मुलांचं भविष्य घडवायचं असेल तर त्याच्यावर अमाप पैसा खर्च करणे गरजेचे आहे, बाहेरील स्पर्धेत आपलं मुलं मागे राहायला नको, आपल्या मैत्रिणी, नातेवाईक ज्या प्रकारे मुलांना सगळं पुरवतात तसेच मी सुद्धा पुरवू शकले पाहिजे हा भ्रम महिलांना चुकीच्या मार्गावर घेवून जातो. मुलांवर खूप पैसा खर्च करणे म्हणजे मुलं घडवणे हा गोड गैरसमज अनेक महिलांचा असतो.

खूपदा पती किंवा जवळच्या नातेवाईकांकडून होणारी पैशांची मागणी पूर्ण करण्यासाठी, स्वतःची प्रतिमा टिकवून ठेवण्यासाठी महिला भ्रष्टाचाराला बळी पडतात. मी घरातील कर्ती स्त्री आहे, कमावती आहे, माझ्या कडून सगळ्यांच्या आर्थिक गरजा भागल्याच पाहिजेत मी कोणालाच नाही म्हणणे योग्य नाही, मला माझी प्रतिमा ढासळू द्यायची नाही या हट्टा मुळे सुद्धा महिलांना भ्रष्टाचार करायला वावगे वाटत नाही.

महिलांमध्ये असलेली असुरक्षिततेची भावना जसे की  भविष्याबद्दलची भीती किंवा “उद्या जर नोकरी नसेल तर काय?”, कोणते मोठे आजारपण आले तर काय? घरात काही मोठा खर्च निघाला तर कस होईल? या विचारातून कोणत्याही मार्गाने संपत्तीचा मोठा साठा निर्माण करण्याची महिलांची प्रवृत्ती वाढते. 

आर्थिक सुरक्षिततेचा अतिरेकी ध्यास व्यक्तीला नीतिमत्ता विसरायला लावतो. मी आणि माझे कुटुंब सगळ्या बाजूने सुरक्षित असले पाहिजे, आम्हाला कधी कोणापुढे हात पासरायची वेळ नाही आली पाहिजे हा देखील महिलांचा हेतू असतो. भूतकाळात अडचणीच्या वेळी नातेवाईकांनी, ओळखीतील लोकांनी अडी अडचणीत आर्थिक मदत नाकारली असल्यास, त्या वेळी खूप आर्थिक त्रास, अपमान झालेला असल्यास महिला दुखावलेल्या असतात. अश्या परिस्थिती मधून गेलेल्या महिलांना सुद्धा खूप पैसे असावेत हे ध्येय वेड्यासारखे मागे लागते आणि त्यासाठी मिळेल ती संधी त्या शोधू लागतात.

सूडबुद्धी, असुया, हेवे दावे महिलांमध्ये जास्त प्रमाणात असतात. काही वेळा कामाच्या ठिकाणी होणारा भेदभाव, डावलले जाणे किंवा पुरुषांच्या तुलनेत कमी महत्त्व मिळणे, इतर महिला सहकाऱ्यांनी आपल्या पुढे जाणे यामुळे महिलांच्या मनात असंतोष निर्माण होतो. “जर व्यवस्था माझ्याशी प्रामाणिक नाही, तर मी तरी का असावे?” या मानसिकतेतून सिस्टीमला, स्वतःच्या कार्यालयाला, स्वतःच्याच वरिष्ठ अधिकारी अथवा सहकारी यांना फसवण्याची प्रवृत्ती निर्माण होऊ शकते.

मानवशास्त्रीय दृष्टिकोनातून, महिलांकडे सहसा ‘प्रामाणिक’ म्हणून पाहिले जाते. याच प्रतिमेचा फायदा घेऊन, “माझ्यावर कुणी संशय घेणार नाही” या अतिआत्मविश्वासातून काही महिला भ्रष्टाचाराचे धाडस करतात. महिला म्हणून मला सहानुभूती मिळेल, अगदीच वेळ आली तर मी इतर सहकाऱ्यावर चुकीचे आरोप करेल, मी आरामात सगळ्यांना इमोशनल ब्लॅकमेल करून यातून सुटेल ही त्यांची धारणा असते.

आजमितीला सगळीकडे फोफावत चाललेला महिलांमार्फत होणारा भ्रष्टाचार थांबवणे, त्याला आळा घालणे अत्यंत महत्वाचे आहे. अश्या प्रवृत्ती वर ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना सगळीकडे राबवणे संबंधित यंत्रनेचे कर्तव्य आहे. 

भ्रष्टाचार ही केवळ कायदेशीर समस्या नसून ती एक मानसिक विकृती आहे. ती रोखण्यासाठी काही उपाय प्रभावी ठरू शकतात. इतर सर्व बाबतीत दयाळू, प्रेमळ, साळसूद, साध्या, भोळ्या असणाऱ्या महिलांना जर अश्या चुकीच्या गोष्टी आकर्षित करत असतील तर त्यांना मूल्यवर्धित शिक्षण आणि संस्कार याची नितांत गरजेचे आहे.

केवळ पदव्या मिळवणे म्हणजे शिक्षण नव्हे. व्यावसायिक नीतिमत्ता हा शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर अनिवार्य विषय असायला हवा. यशाची व्याख्या ‘कमावलेला पैसा’ नसून ‘कमावलेली प्रतिष्ठा’ असावी, हे बिंबवणे गरजेचे आहे. आपले नाव, प्रतिमा, व्यक्तिमत्व लोकांनी कायम लक्षात ठेवावे, आपले तत्व, आदर्श, मूल्य इतरांनी देखील अंमलात आणावेत अशी मानसिकता तयार होणे अपेक्षित आहे.

मानसिक समुपदेशन यामध्ये खूप मोठे योगदान देवू शकते.

मोठ्या कंपन्या किंवा सरकारी संस्थांमध्ये कर्मचाऱ्यांसाठी नियमित समुपदेशन सत्रे आयोजित करावीत. कामाचा ताण, कौटुंबिक समस्या किंवा आर्थिक विवंचना यावर मोकळेपणाने बोलल्यास भ्रष्टाचाराकडे वळण्याची शक्यता कमी होते.

पारदर्शक कार्यप्रणाली 

डिजिटलायझेशन आणि तंत्रज्ञानाचा वापर वाढवून मानवी हस्तक्षेप कमी केल्यास भ्रष्टाचाराची संधीच मिळणार नाही. सी सी टीव्ही प्रमाणेच डिजिटल ऑडिट ची कठोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. समाधानाचा दृष्टिकोन विकसित करणे, आहे त्यात खुश राहण्याची,  मिळत आहे त्यात आनंद मानण्याची मानसिकता रुजवणे गरजेचे आहे. 

महिलांनी ‘हव्यास’ आणि ‘गरज’ यातील फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे. योगाभ्यास, ध्यानधारणा, आपली अध्यात्मिक उन्नती साधने, निसर्गाचा सहवास, आपल्या जवळच्या गरिबातील गरीब व्यक्तीशी केलेल्या सुखं दुःखाच्या गप्पा आणि साधी जीवनशैली स्वीकारल्याने मानसिक शांतता मिळते. सतत श्रीमंत, अती पैशावाल्या लोकांमध्ये राहून अथवा सतत तोच विचार आणि तुलना करून मनात चुकीच्या मार्गांनी पैसे मिळवण्याची इच्छा निर्माण होते. त्यामुळे महिलांनी कितीही उच्च पदस्थ असल्या तरी अगदी आपली कामवाली, भाजीवाली, दूधवाला, इस्त्री वाला घरातील इतर नौकर चाकर आजूबाजूला राहणारे सर्वसामान्य माध्यम वर्गीय शेजारी या सगळ्याशी मनमोकळ्या गप्पा मारणे गरजेचे आहे त्यावेळी समजते की आपल्याला देवाने भरभरून दिले आहे जे आहे ते टिकवणे आणि नैतिकतेच्या मार्गाने वाढवणे इतकेच माझे कर्तव्य आहे.

सामाजिक माध्यमातून काय घ्यावे, किती घ्यावे यावर महिलांनी स्वतः मर्यादा घातली पाहिजे. दाखवणारे सगळं छान छान च दाखवणार आहेत पण आपण आपल्या वास्तव आयुष्याचे भान ठेवून राहिले पाहिजे.

भ्रष्टाचार करणाऱ्या महिलांना पाठीशी नं घालता कठोर कायदेशीर कारवाई आणि सामाजिक बहिष्कार, 

भ्रष्टाचार सिद्ध झाल्यास पदाचा किंवा लिंगाचा विचार न करता कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे. तसेच, अशा प्रवृत्तींना समाजात प्रतिष्ठा न मिळता त्यांचा निषेध झाला पाहिजे, जेणेकरून इतरांवर वचक बसेल. सामाजिक माध्यमातून, चॅनेल, वर्तमान पत्र यातून अश्या घटना घडल्यावर तज्ज्ञ लोकांचे लिखाण, चर्चा या परखड पणे प्रसारित झाल्या पाहिजेत. महिला आहे म्हणून कोणतीही विशेष वेगळी वागणूक चुकीच्या कृत्यला मिळणे योग्य नाही.

थोडक्यात सांगायचे तर, आर्थिक सुबत्ता ही माणसाला सुख देऊ शकते, पण समाधान हे केवळ प्रामाणिकपणातूनच मिळते. महिलांनी ज्याप्रमाणे आपल्या कर्तृत्वाने समाजाचा विश्वास जिंकला आहे, तो विश्वास टिकवून ठेवणे हीच काळाची गरज आहे. त्यासाठी महिलांनी सत्याच्या वाटेवर चालणे, स्वतःवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे.

काउन्सिलर मीनाक्षी जगदाळे

9766863443

Comments are closed.