
- खासदार राजाभाऊ वाजे यांचा प्रशासनाला इशारा
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन मागील १० ते १५ दिवसांपासून बंद असल्याने ग्रामीण, दुर्गम व आदिवासी भागातील गोरगरीब रुग्णांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. या गंभीर बाबीची दखल घेत खासदार राजाभाऊ वाजे यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना खरमरीत पत्र पाठवून सिटी स्कॅन सेवा तात्काळ सुरू करण्याची मागणी केली आहे.
जिल्हा रुग्णालय हे उत्तर महाराष्ट्रातील हजारो रुग्णांसाठी महत्त्वाचे आरोग्य केंद्र आहे. मात्र, सिटी स्कॅन मशीन बंद असल्यामुळे अपघातग्रस्त, मेंदूविकार तसेच अन्य गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याशिवाय काही रुग्णांना खासगी निदान केंद्रांमध्ये सिटी स्कॅन करण्यासाठी पाठविले जात असल्याच्या तक्रारीही प्राप्त झाल्याचे खासदार वाजे यांनी पत्रात नमूद केले आहे.
खासगी केंद्रांमध्ये सिटी स्कॅनसाठी हजारो रुपयांचा खर्च करावा लागत असल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांवर मोठा आर्थिक बोजा पडत आहे. शासनाच्या आरोग्यसेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशालाच यामुळे धक्का बसत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.
सिटी स्कॅन मशीन इतक्या दीर्घकाळ बंद राहण्यामागील कारणे, दुरुस्तीच्या प्रक्रियेत झालेला विलंब तसेच जबाबदार अधिकारी व यंत्रणांची चौकशी करण्याची मागणी खासदार वाजे यांनी केली आहे.
जनतेच्या आरोग्याशी संबंधित अशा गंभीर विषयात कोणतीही हलगर्जीपणा सहन केला जाणार नसून, त्वरित कार्यवाही न झाल्यास संबंधित वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करून आवश्यक ती पुढील कारवाई करण्यात येईल, असा इशाराही खासदार राजाभाऊ वाजे यांनी दिला आहे.
—
“गोरगरीब रुग्णांना खासगी रुग्णालयांचे उंबरठे झिजविण्याची वेळ येणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. जिल्हा रुग्णालयातील सिटी स्कॅन सेवा तात्काळ सुरू करून रुग्णांना दिलासा देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे.”
: राजाभाऊ वाजे, खासदार, नाशिक
Comments are closed.