
- औषधांची नशा आणि गुंगीसाठी बेकायदेशीर विक्री; गुजरात कनेक्शन उघड
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : मालेगाव शहरात नशेच्या औषधांची तस्करी करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी ‘मकोका’ अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे. ८ जणांच्या टोळीच्या कृत्यामुळे मालेगाव ते गुजरात दरम्यान पसरलेल्या ड्रग्ज कनेक्शनचा भांडाफोड झाला आहे. संघटीत गुन्हेगारीच्या प्रकारातील या टोळीचा म्होरक्या शहीद जाफर इम्तियाज अहमद उर्फ पोगार हा असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
सहायक पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बारवाल यांनी गेल्या फेब्रुवारी २०२६ मध्ये शहरात टाकलेल्या एका धाडीत कोडीन फोस्फेट कफ सिरपच्या तब्बल १२०० बाटल्यांचा साठा जप्त केला होता, ज्याचे बाजारमूल्य लाखोंच्या घरात होते. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली होती. तपासांती या औषधांची नशा आणि गुंगीसाठी बेकायदेशीर विक्री होत असल्याचे उघड झाले होते. या प्रकरणातील सविस्तर तपासासाठी मालेगाव पोलिसांनी गुजरात गाठून औषध विक्रीचे केंद्र अहमदाबाद येथील एक फार्मा कंपनी असल्याची उकल केली. या कंपनीमार्फत बडोद्याचे दोन मेडिकल शॉप्स आणि तेथून मालेगावला औषध विक्री झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी दोन्ही मेडिकल शॉप्स चालकांच्या विरोधातही गुन्हा दाखल केला आहे.
फरार चौकडीचा शोध जारी
सिद्धार्थ बारवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार शहीद जाफर इम्तियाज अहमद उर्फ पोगार याच्याविरोधात अमली पदार्थ विक्रीचे एकूण दहा गुन्हे दाखल आहेत. त्याच्यासह इतर तीन साथीदारांना पोलिसांनी बेड्या घातल्या असून फरार इतर चौघांचा कसून तपास सुरु आहे. या टोळीविरोधात ‘मकोका’ अंतर्गत कारवाईस विशेष पोलीस महानिरीक्षकांनी हिरवा कंदील दाखवल्याची माहितीही बारवाल यांनी दिली.
Comments are closed.