- लाचप्रकरण अंगलट येणार की मंत्रीपदी कायम राहणार ? समर्थकांत धाकधूक वाढली
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : ऐन अधिवेशन काळात विधिमंडळ सभागृहात रमी खेळत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आधी मंत्रालय बदल आणि लगोलग मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागण्याची अपरिहार्यता तत्कालीन मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अंगलट आली होती. आता अन्न व औषध प्रशासन कार्यालयात एका लिपिकाला ३५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने रंगेहाथ पकडल्याने जिल्ह्यातील दुसरे मंत्री नरहरी झिरवाळ अडचणीत आले आहेत. विरोधकांकडून झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असल्याने राज्य सरकारवर, दबाव वाढला आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस नेत्या सुनेत्रा पवार नेमका काय पवित्रा घेतात, याबाबत संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असलेल्या झिरवाळ यांना प्रथमच मंत्रिपद बहाल करण्यात आले. त्यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन खाते सोपवण्यात आले. तथापि, त्यांच्याच मंत्रालयातील लिपिक राजेंद्र ढेरिंगे याला काही दिवसांपूर्वी लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने रंगेहाथ पकडले. एसीबीने राजेंद्र ढेरिंगे याच्या नाशिक रोड येथील घराची झडती घेतली असता पथकाच्या हाती काही महत्त्वाची कागदपत्रे हाती लागली आहेत. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढल्याचे बोलले जात आहे. राजेंद्र ढेरिंगे याच्या लाचखोरीचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचणार, अशीही चर्चा सुरु झाली आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मंत्री झिरवाळ हे दोन दिवस ‘नॉट रिचेबल’ होते. त्यांचा अज्ञातवास या प्रकरणातील सस्पेन्स वाढवणारा ठरला. तथापि, त्यासाठी त्यांनी तांत्रिक कारण पुढे करून अज्ञातवासात असल्याची चर्चा तथ्यहीन असल्याचा खुलासा केला. या प्रकरणाची चौकशी करून आपला प्रत्यक्षाप्रत्यक्ष सहभाग असल्याचे सिद्ध झाल्यास राजीनामा देण्याचे स्वतः झिरवाळ यांनी जाहीर केले.
प्रस्थापित आदिवासी चेहरा
लाचप्रकरणी ढेरिंगे याच्या अटकेनंतर विभागाचे मंत्री झिरवाळ यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. विरोधी मविआने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात असलेल्या झिरवाळ यांच्यावर प्रथमच असे आरोप झाल्याने त्यांच्या समर्थकांत चिंतेचे वातावरण आहे. उत्तर महाराष्ट्रातील एक प्रस्थापित आदिवासी चेहरा म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसने आधी विधानसभा उपसभापती आणि त्यानंतर कॅबिनेट मंत्री करून झिरवाळ यांचा सन्मान केला आहे. आता झिरवाळ यांच्या मंत्रिपदाला अभय मिळते की त्यांनाही कोकाटे यांच्याप्रमाणे पायउतार व्हावे लागते, याकडे जनतेचे लक्ष लागून राहणार आहे.
Comments are closed.