नाशिक/एनजीएन नेटवर्क
येथील विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी एक कटू प्रसंग घडला. भूमी अभिलेखच्या चुकीच्या कारभारामुळे वडिलोपार्जित क्षेत्र गमावल्याचा आरोप करत चांदवड तालुक्यातील योगेश खताळ यांनी विभागीय महसूल आयुक्त कार्यालयाबाहेर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. आत्मदहन करण्यासाठी खताळ हे पेट्रोल घेऊन येताच पोलिसांनी ताब्यात घेतले. पाेलिसांनी प्रसंगावधान राखत त्यास ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला. योगेश खताळ असे त्या तरुणाचे नाव आहे.
गेल्या चाळीस दिवसांपासून भूमी अभिलेखच्या कारभारामुळे जमीन गेल्याच्या प्रकरणातून तो आंदोलन करत होता. त्यासाठी उपोषण आंदोलनदेखील केले आहे; मात्र याची दखल कोणीच घेतली नाही, म्हणून योगेश खताळ याने स्वातंत्र्य दिनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार आज सकाळी विभागीय आयुक्त कार्यलयाबाहेर असताना त्याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या वेळी सुरक्षेसाठी तैनात पोलिसांनी त्यास ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेले.