NGN News
Latest Marathi News

135 महिलांची लाखोंची फसवणूक; भामट्याची कोठडीत रवानगी

  • बागलाण तालुक्यातील मुंजवाड येथील प्रकार

** श्रीकांत रौंदळ

सटाणा : एनजीएन न्यूज नेटवर्क

लघु उद्योगासाठी कर्ज मिळवून देतो अशी बतावणी करून बागलाण तालुक्यातील मुंजवाड येथील महिलांना लाखो रुपयाचा गंडा घालणाऱ्या शुभम प्रकाश देवरे (रा. मालेगाव ) या भामट्यास पोलिसांनी अटक करून सटाणा न्यायालयात उभे केले असता त्यास 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्याचे आदेश न्यायमूर्तींनी दिले असून नाशिक येथील जिल्हा कारागृहात त्याची रवानगी करण्यात आली आहे.

मुंजवाड येथील रत्ना राजेंद्र शेवाळे या महिलेने स्वतःसह 135 महिलांची लाखो रुपयांची फसवणूक केल्यासंदर्भात दि. 26 मे 2025 रोजी शुभम देवरे याचे विरोधात सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्या अनुषंगाने सटाणा पोलिसांनी 31 जानेवारी रोजी त्यास अटक करून रविवारी सटाणा न्यायालयात उभे केले असता त्यास तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. आज पुनश्च त्यास न्यायालयात उभे केले असता 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, मुंजवाड येथील रत्ना राजेंद्र शेवाळे या कंधाणा फाटा येथे आपल्या भाजीपाला दुकानावर असताना शुभम प्रकाश देवरे हा तिथे आला व त्याने शेवाळे यांना लघुउद्योग सुरू करण्यासाठी एक लाख रुपयांचे मुद्रा लोन मंजूर करून देतो व त्यावर 35 टक्के सबसिडी मिळवून देतो असे सांगितले. त्यानुसार देवरे याच्यावर विश्वास ठेवून संबंधित 135 महिलांनी प्रत्येकी 4000 रुपयांप्रमाणे पाच लाख 40 हजार रुपये त्याचे कडे दिले. त्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, बँकेचे पासबुक झेरॉक्स प्रति व दोन फोटो जमा करून घेतले व एक महिन्यात कर्ज मंजूर करून देतो, तुमच्या बँक खात्यावर पैसे जमा होतील असे सांगितले. मात्र कर्जही मंजूर झाले नाही व 135 महिलांकडून प्रत्येकी घेतलेले 4000 रुपये देखील परत केले नाहीत. त्याच्याशी रत्ना शेवाळे व इतर महिलांनी वेळोवेळी संपर्क केला असता वेगवेगळी कारणे सांगून तो उडवा उडवीची उत्तरे देत असल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर शेवाळे यांनी सटाणा पोलीस ठाण्यात त्याचे विरोधात 26 मे 2025 रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान सटाणा पोलिसांनी अनेक दिवसांपासून त्याचा शोध घेणे सुरू केले होते मात्र तो सापडून येत नव्हता. अखेर पोलिसांनी सापळा रचून दि. 31 जानेवारी 2025 रोजी त्यास अटक केली आहे. सटाणा न्यायालयाने त्यास 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली असून त्याची रवानगी नाशिक जिल्हा कारागृहात करण्यात आली आहे.

Comments are closed.