NGN News
Latest Marathi News

जुन्या भांडणाच्या कुरापतीतून चौसाळेत युवकाला संपवले; ६ संशयित ताब्यात

घटनेत आणखी एक युवक गंभीर जखमी ; संशायीतांत दोन अल्पवयीन मुलांचा समावेश

वणी : विशेष प्रतिनिधी

जुन्या भांडणांच्या कुरापतीतून झालेल्या वादात १८ वर्षीय तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना दिंडोरी तालुक्यातील चौसाळे गावात बुधवारी रात्री घडली. घटनेत आणखी एक युवक गंभीर जखमी झाला आहे. बुधवारी ( दि. २२ ) रात्री अकरा वाजेच्या दरम्यान पारा परिसरात ही घटना घडली. मृत तरुणाचे नाव राहुल किशोर काळे (वय १८, रा. एकलहरे) असून, विजय पवार ( वय १७) हा युवक गंभीर जखमी झाला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, काल रात्री चौसाळे गावात तमाशाचा कार्यक्रम सुरू होता. गर्दीच्या पार्श्वभूमीवर काही युवकांनी जुन्या वादाची कुरापत काढत वाद सुरू केला. हे भांडण सोडविण्यासाठी विशाल पवार पुढे आला असता मला का मारले असा जाब विचारल्याने त्यांच्यात वादावादी झाली. यानंतर राहुल याच्यावर कटरने वार करण्यात आला. त्याच गटातील राहुल काळे याच्यावरही तीक्ष्ण हत्याराने छाती व पाठीवर वार करण्यात आले. त्यात प्रचंड रक्तस्राव झाल्याने आणि वेळेवर उपचार न मिळाल्याने राहुलचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच वणी पोलिस ठाण्याचे पोलीस यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी राहुल आणि इतर जखमींना रुग्णालयात हलवले, मात्र डॉक्टरांनी राहुलला मृत घोषित केले. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत सहा संशयितांना ताब्यात घेतले. त्यात मोहन लहु पवार, दीपक धनराज गायकवाड, योगेश बाळू गायकवाड, निवृत्ती पोपट चौधरी आणि दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. या प्रकरणी मृतक राहुल काळे यांच्या आईच्या फिर्यादीवरून वणी पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सपोनी गायत्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश कुटे करीत आहेत. घटनेमुळे चौसाळे व परिसरात तणावाचे वातावरण आहे.

Comments are closed.