गुंडा विरोधी पथकाची कामगिरी; दुबई यात्राप्रसंगी फसवणूक
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
दुबई प्रवासासाठी विमानाची बनावट तिकिटे काढून देत एका यात्रा आयोजक कंपनीची फसवणूक करणाऱ्या तेजस शशिकांत वैष्णव ( ३१ वर्षे ) या युवकास गुंडा विरोधी पथकाने पुण्यातून अटक केली आहे. संबंधित युवकाने चौधरी यात्रा कंपनीला लाखो रुपयांना चुना लावल्याची माहिती पुढे येत आहे.
प्राप्त माहितीनुसार, चौधरी यात्रा कंपनीने १६ ते २२ जानेवारी २०२५ दरम्यान मुंबई ते दुबई आणि अबुधाबी ते मुंबई अशा यात्रेचे आयोजन केले होते. त्यानुसार एकूण ५० यात्रेकरूंसाठी मुंबई ते दुबई हवाई प्रवासाची तिकिटे काढण्यासाठी यात्रा कंपनीने संगमनेर ( जि. अहिल्यानगर ) येथील माईलस्टोन होलीडेज प्रा. लि. यांना १०,८२,५०० रुपये इतकी रक्कम बँक खात्याद्वारे देवून तिकिटे काढण्याचे काम दिले होते. त्याप्रमाणे संशयित तरुणाने ५० प्रवाशांचे एअर इंडिया आणि इंडिगो विमानांची तिकिटे यात्रा कंपनीला पाठवली. दि. १६ जानेवारी २०२५ रोजी प्रवासी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबईला जाण्यासाठी ५० प्रवासी पोहचले असता केवळ चार तिकिटे विमानतळाच्या सिस्टमवर ग्राह्य धरली गेली. उर्वरित ४६ तिकिटे नाकारण्यात आली. परिणामी सदरची यात्रा रद्द करण्याची नामुष्की यात्रा कंपनीवर आली.
माईलस्टोन होलीडेज प्रा. लि.ने आपली फसवणूक करून बदनामीस कारणीभूत होणारी कृती केल्याबद्दल चौधरी यात्रा कंपनीने १९.८२ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी १८ जानेवारी २०२५ रोजी नाशिक सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार, गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी ज्ञानेश्वर मोहिते यांना मिळालेल्या माहितीनुसार गुन्ह्यातील आरोपी तेजस शशिकांत वैष्णव हा माईलस्टोन होलीडेजच्या पुण्यातील कार्यालयात काम करीत आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार, मोहिते यांनी तेजस याला पुण्याच्या बाणेर परिसरातून शिताफीने अटक केली. त्याला नाशिक सायबर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपयुक्त किरणकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी ज्ञानेश्वर मोहिते, विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, सुनील आडके, गणेश भागवत यांनी संयुक्तरित्या यशस्वी केली.
Comments are closed.