नाशिक/एनजीएन नेटवर्क
ऑनलाईन व्यवसायासाठी गुंतवणूक करणाऱ्या युवकाला तब्बल २४ लाख २५ हजार रुपये गमावण्याची वेळ आली. नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून भामट्यांनी संबंधितास गंडवल्यानंतर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदित्य अहिरराव असे या युवकाचे नाव असून तो अमृतधाम परिसरात वास्तव्यास आहे.
प्राप्त माहितीनुसार, आदित्य हा गेल्या महिन्यात इंटरनेटवर आभासी पध्दतीने काही व्यवसाय करता येतो का, याचा शोध घेत असताना सायबर भामट्यांनी त्याच्याशी संपर्क साधला. एका विशिष्ट क्रमांकावरुन संभाषण करत भामट्याने आदित्यचा विश्वास संपादन केला. त्यापैकी एका भामट्याने क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्याने वेगवेगळ्या बँक खात्यावर तसेच युपीआय आयडीच्या माध्यमातून आदित्य यास पैसे भरण्यास भाग पाडले. आदित्याने २६ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत २४ लाख २५ हजार ५०५ रुपये गुंतवले. संशयितांचा संपर्क तुटल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने पोलिसात धाव घेतली. सायबर पोलीस ठाण्यात अर्ज दिल्यानंतर पोलिसांना बँक खात्यात असलेले चार लाख रुपये गोठविण्यात यश आले.